हंडाभर पाण्यासाठी दिवसभर पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2016 09:35 PM2016-02-27T21:35:44+5:302016-02-27T21:40:42+5:30

वटारला टंचाई : चार दिवसाआड पाणी; टॅँकरची व्यवस्था करण्याची नागरिकांची मागणी

Whole day for water | हंडाभर पाण्यासाठी दिवसभर पायपीट

हंडाभर पाण्यासाठी दिवसभर पायपीट

Next

वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील वटार, चौंधाणे, कंधाणे, डोंगरेज आदि गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. वटार येथे ग्रामपंचायत प्रशासनाने पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे काम करूनही गावाला चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असल्याने टॅँकरची व्यवस्था प्रशासनाने
करावी, अशी मागणी सरपंच प्रशांत बागुल यांनी केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून सतत दुष्काळाला सामोरा जाणारा परिसरातील शेतकरीवर्ग यावर्षी तर दुष्काळाच्या छायेत आहे. विहिरींची पाण्याची पातळी खालावलेली असून, लावलेला कांदा पाण्याअभावी सोडण्याच्या बेतात बळीराजा आहे. या असमानी व सुलतानी संकटांनी पिचलेला बळीराजासमोर नवीन संकट निर्माण झाले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी नवीन विहिरी खोदण्याचा निर्णय घेतला असून, व्याजाने उसने पैसे घेऊन विहिरींचे काम केले; पण गाठीचा पैसाही गेला व उलट कर्जाचा बोजा अंगावर पडला.
ग्रामपंचायतीने दखल घेत गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरीचे खोदकाम करूनही विहिरीला पाणी कमकुवत स्वरूपाचे लागले असून, ४० ते ४५ मिनिट विहीर चालते. त्यामुळे पाण्याची टाकी तीन ते चार दिवस भरत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने निर्णय घेतला असून, चार दिवसाआड गावाला पाणीपुरवठा होत आहे. जर पाण्याची अशीच परिस्थिती राहिली तर मे व जूनमध्ये १० ते १५ दिवसात गावाला पाणीपुरवठा होईल, असे मत सरपंचानी व्यक्त केले आहे. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना व्हायला हवी.
शेतकऱ्यांच्या विहिरींचे तळ गाठल्याने सर्वात जास्त फटका कांदा पिकाला बसला असून, ऐन जांगडवर असलेला कांदा शेतकऱ्यांना सोडावा लागत आहे. न पेलवणारा खर्च करून लागवड केलेला कांदा शेवटी शेतकऱ्यांना डोळ्यात आसू आणत आहेत. जनावाऱ्यांच्या चाऱ्याचा तर फार मोठा प्रश्न उभा राहिला असून, चाऱ्याच्या प्रशासनाने छावण्या लावण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Whole day for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.