एकमेकांना आधार देत संपूर्ण कुटुंबीयांनीच केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:13 AM2021-05-15T04:13:26+5:302021-05-15T04:13:26+5:30
नाशिक : कोरोना संकटकाळात शारीरिक अंतरपथ्य आवश्यक असते. नाही तर संसर्ग वाढण्याचा धोका अधिक असतो. मात्र, छोट्या कुटुंबात कोणा ...
नाशिक : कोरोना संकटकाळात शारीरिक अंतरपथ्य आवश्यक असते. नाही तर संसर्ग वाढण्याचा धोका अधिक असतो. मात्र, छोट्या कुटुंबात कोणा एकाला संसर्ग झाल्यास विलगीकरणात राहिलेल्या रुग्णाला ना कोणाला भेटता येते ना संपर्क करता येतो त्यामुळे आजाराने आधीच भयभीत झालेल्या रुग्णाला अधिकच नैराश्य आणि नकारात्मकता येते असा अनुभव आहे. मात्र दुसरीकडे नाशिकमध्ये एकत्र कुटुंबात राहणाऱ्या अनेक कुटुंबांतील आठ ते दहा रुग्ण बाधीत झाले आणि त्यांनी एकमेकांना साथ दिली. एकाकीपणाची जाणीव करून दिली नाही. त्यामुळे अशा सकारात्मतेच्या परिणामातूनही अनेक कुटुंबांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोनामुळे सख्खे आप्तेष्ट दुरावल्याच्या अनेक घटना घडतात. कोणा व्यक्तीला कोरोना झाला तर त्याच्यावर वेगळे राहण्याचे दडपण वाढते. विलगीकरणात राहणे गैर नाही. मात्र, त्याला मानसिक आधार आणि सैदव बरोबर असल्याची अनुभूती देणे आवश्यक असते. नाशिकमध्ये पहिल्या लाटेत कुटुंबातील एक दोन सदस्य बाधित झाले, मात्र यंदा दुसऱ्या लाटेत सर्व कुटुंबच्या कुटुंब बाधित तर काही ठिकाणी एकाच कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल व्हावे लागले. काही ठिकाणी मात्र कुटुंबातील सर्व सदस्य एकाच ठिकाणी राहिले आणि एकमेकांची साथ तसेच मदत, सहकार्य आणि मानसिक अधिकार यामुळे कोरोनाच्या संकटावर मात केली. विशेष म्हणजे अशा कुटुंबांतील अनेकांनी एकत्र कुटुंब हीच ऊर्जा असल्याचे सांगून कुटुंब दिनाच्या पूर्वसंध्येला एकत्र कुटुंबाचे महत्त्वही अधोरेखित केले.
इन्फो...
नाशिकच्या पारख फॅमिलीत सात जणांना गेल्या महिन्यात कोरोना संसर्ग झाला. त्यावर त्यांनी एकमेकांच्या मदतीने मात केली. लोकेश आणि त्यांचे दुसरे बंधू नीलेश तसेच आई-वडील असे सर्व कुटुंब एकत्र राहते. नीलेश आणि त्यांची पत्नी पॉझिटिव्ह आल्यानंतर दोन-चार दिवसांतच त्यांचे वडील तसेच लोकेश अशा सर्वांनाच ताप आला आणि नंतर सर्व कुटुंबच मुलांसह बाधित झाले. त्यांची आई श्रीमती आशा यांना मधुमेह असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र, वडील किसनलाल, लोकेश यांच्या पत्नी सपना, मुलगी पायल, मुलगा सफल असे सर्व पाॅझिटिव्ह होते. सर्वच घरी होते. त्याचबरोबर जवळच राहणाऱ्या हितेश या बंधूंनीही त्यांना आवश्यक ती औषधे आणि साहित्य आणून दिले. आणि एकमेकांच्या मदतीने त्यांनी कोरोनावर मात केल
इन्फो..
गंगापूररोडवरील ॲड. मनोज आंबाडे यांच्या कुटुंबानेदेखील एकमेकांच्या साथीने सहकुटुंब कोरोनावर मात केली. मनोज आणि त्यांचे बंधू संजय हे दोघेही वकील आहेत. त्यांच्या आई आशा आंबाडे या सर्वप्रथम पॉझिटिव्ह आल्या आणि नंतर कुटुंबातील एकूण नऊ जण पॉझिटिव्ह आले. त्यातील केवळ आशा आंबाडे यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. परंतु कुटुंब आणि विशेषत: नातवंडांच्या ओढीने त्या बऱ्या झाल्या. एकत्रित कुटुंबामुळे मनोधैर्य वाढल्याचे ॲड. मनोत आंबाडे सांगतात. या घटनेनंतर अन्य कोणा परिचिताला कोरोना झालाच तर त्यांच्या मदतीसाठी आंबाडे कुटुंब आवर्जून धावून जातात.