डॉक्टर, नर्सेससह सारी यंत्रणाच हतबल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:15 AM2021-04-22T04:15:26+5:302021-04-22T04:15:26+5:30
नाशिक : रुग्णालयातील ऑक्सिजनचा मुख्य पुरवठाच ठप्प झाल्याने सर्वत्र अनागोंदी माजली, अशाप्रसंगी पर्यायी कोणताच ऑक्सिजनपुरवठा उपलब्ध नसल्याने डॉक्टर, नर्सेस, ...
नाशिक : रुग्णालयातील ऑक्सिजनचा मुख्य पुरवठाच ठप्प झाल्याने सर्वत्र अनागोंदी माजली, अशाप्रसंगी पर्यायी कोणताच ऑक्सिजनपुरवठा उपलब्ध नसल्याने डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉयसह सारी यंत्रणाच हतबल झाली. या आपत्कालीन परिस्थितीमुळे एकाचवेळी अनेक नागरिकांना जीव गमवावा लागल्याने कर्तव्यावर असलेल्या अनेक नर्सदेखील भांबावल्या, रडू लागल्याचे दृश्य हृदय विदीर्ण करणारे होते.
रुग्णालयातील १५७ रुग्णांपैकी ६३ रुग्ण अत्यवस्थ होते. तरीदेखील किमान आठवडाभरापासून या रुग्णांचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या डॉक्टर, नर्सनादेखील या आपत्कालीन परिस्थितीची अजिबात कल्पना नव्हती. दुपारच्या सुमारास अचानकपणे ऑक्सिजन लिक झाल्याचे कळताच कर्तव्यावर असलेले सर्व डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉयची यंत्रणा प्रचंड धावपळ करु लागली. मात्र, अचानकपणे बहुतांश रुग्णांचा जीव ऑक्सिजनअभावी एकाचवेळी वरखाली होऊ लागल्याने नक्की कुणाकडे बघावे, कुणाचा जीव वाचवावा, कुणाचा आरडाओरडा अशा परि्स्थितीत कुणाकडे लक्ष द्यावे हेदेखील कळेनासे झाले. काही रुग्णांचे नातेवाईक बाहेरुन जिथून मिळतील, तिथून ऑक्सिजन सिलेंडर आणत होते. तरीदेखील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने आणि सर्वप्रथम एकामागोमाग एक व्हेंटिलेटरवरील रुग्ण प्राण सोडू लागले. तर अनेक गंभीर रुग्णदेखील जीव वाचवण्यासाठी आक्रोश करु लागल्यानंतर सारी यंत्रणाच हतबल झाली. डॉक्टर आणि नर्स समोर उपस्थित असतानाही रुग्ण जीव सोडू लागल्याने वैद्यकीय यंत्रणेलादेखील काहीच उमजेनासे झाले.
इन्फो
नर्सेसनाही अश्रू अनावर
रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचे आकांडतांडव आणि मृत्यूचे तांडव नजरेसमोर दिसत असताना आपण काहीच करु शकत नसल्याची जाणीव काही नर्सेसना अस्वस्थ करुन गेली. इतके विदारक चित्र तासभर समोर दिसत असल्याने काही नर्सेसचादेखील धीर सुटला. त्यांनादेखील अश्रू अनावर झाल्याचे करुण दृश्य हॉस्पिटलमध्ये दिसत होते.