एका व्यक्तीमुळे झाले अख्खे गाव क्वारंटाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 07:41 PM2020-06-19T19:41:15+5:302020-06-19T19:42:34+5:30
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या सध्या एकट्या जायखेड्यात असून, आरोग्य विभागाच्या तपासणीत ५५ व्यक्ती कोरोनाबाधित सापडल्याने धावपळ उडाली आहे. या सर्वांना उपचारासाठी दाखल करण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : लॉकडाऊनच्या काळात गरज म्हणून घराकडे पायीच निघालेल्या परप्रांतीयांना त्यांच्या मूळ गावापर्यंत पोहोचविणाऱ्या बागलाण तालुक्यातील जायखेड्यातील एक युवकच कोरोनाबाधित झाला. परंतु त्याची लक्षणे वेळीच निदर्शनास न आल्याने योग्य तो उपचार होऊ शकले नाहीत, परिणामी त्याचा कोरोनाने बळी घेतला. मात्र त्याची पुसटशी कल्पनाही नसलेले ग्रामस्थ कळत न कळत त्याच्या संपर्कात आल्याने अखेर अख्ख्या गावालाच क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या सध्या एकट्या जायखेड्यात असून, आरोग्य विभागाच्या तपासणीत ५५ व्यक्ती कोरोनाबाधित सापडल्याने धावपळ उडाली आहे. या सर्वांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असले तरी, बाधित रुग्णांचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून रुग्णाच्या घरापासून शंभर मीटरपर्यंत कन्टेन्मेंट झोन जाहीर केल्याने अख्खे गावच क्वारंटाइन झाले असून, गावातील सर्व दुकाने व व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहे. दोन दिवसांपूर्वी एखाद्या गावात एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची ही पहिलीच घटना आहे. वाहनचालक असलेल्या जायखेडा येथील तरुणाने लॉकडाउनच्या काळात अनेकांना मूळ गावी पोहोचविण्याचे काम केले. या काळात तो स्वत:च कोरोनाच्या विळख्यात सापडला. मात्र त्याची लक्षणे उशिरा लक्षात आली. तोपर्यंत त्याच्या संपर्कात कळत न कळत अनेक ग्रामस्थ आले. मात्र कोरोनामुळे त्याची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल केले व उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर तो कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मात्र गावकऱ्यांचे धाबे दणाणले व त्यांनी तपासणी करून घेण्यास सुरुवात केल्यावर एकाच दिवसात ५५ कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, आरोग्य विभागाने संपूर्ण गावात कन्टेन्मेंट झोन जाहीर केला असून, नागरिकांना बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ७४ वैद्यकीय पथकांमार्फत प्रत्येकाची घरोघरी जाऊन तपासणी केली जात असून, शुक्रवारपर्यंत साडेचार हजार नागरिकांची आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे.