घाऊक किराणा दुकानदारांचा उद्याचा बंद मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 09:44 PM2020-05-17T21:44:01+5:302020-05-17T21:47:47+5:30
जीवनावश्यक बाब म्हणून किराणा दुकानदार दुकाने खुली ठेवून नागरिकांना सेवा देत आहेत. मात्र, असे असताना बाजार समितीकडून दुकानदारांची अडवणूक सुरू असून दहापट दंड आकारण्यात येत असल्याची नाशिक धान्य किराणा व्यापारी संघटनेची तक्रार
नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आकारण्यात येणाऱ्या उपकारावर दहापट दंड वसूल करण्यात येत असल्यामुळे शहरातील घाऊक किराणा दुकानदारांनी येत्या सोमवारपासून (दि १८) पुकारलेल्या दुकान बंदचा इशारा अखेर मागे घेण्यात आला आहे. जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
जीवनावश्यक वस्तूंवर चुकीच्या पद्धतीने उपकर आकारणी केली जात आहे. राज्यातील बाजार समित्यांकडून आकारण्यात येणाऱ्या या उपकराबाबत उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू असतानाच नाशिकमध्ये यासंदर्भात व्यापारी अडचणीत आले आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने घाऊक धान्यावर एक्का बाजार उपकर वसुली केला जातो. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदी आहे अशा स्थितीतही जीवनावश्यक बाब म्हणून किराणा दुकानदार दुकाने खुली ठेवून नागरिकांना सेवा देत आहेत. मात्र, असे असताना बाजार समितीकडून दुकानदारांची अडवणूक सुरू असून दहापट दंड आकारण्यात येत असल्याची नाशिक धान्य किराणा व्यापारी संघटनेची तक्रार आहे.
यासंदर्भात यापूर्वी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर बाजार समितीने दहा ऐवजी पाचपट दंडाची आकारणी सुरू केली. त्यामुळे सोमवारपासून नाशिकमधील किराणा दुकाने बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला होता. मात्र रविवारी(दि १७) जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकेत, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरुण काळे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी अधिकारी यांच्यात चर्चा झाली त्यानुसार व्यापाऱ्यांची अडवणूक केली जाणार नाही त्यांनी नियमितपणे उपकर भरावा असे मान्य करण्यात आल्याने सोमवारपासून करण्यात आलेल्या किराणा दुकान बंदचे आंदोलन मागे घेण्यात आले, असे संघटनेचे नेते प्रफुल्ल संचेती यांनी सांगितले.