‘ते’ व्हेंटिलेटर्स खासगी रुग्णालयांना का दिले नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 01:34 AM2020-09-06T01:34:22+5:302020-09-06T01:35:44+5:30
महापालिकेच्या बिटको रुग्णालयात केवळ २३ किलो लिटर्सच्या टाकीअभावी पंधरा व्हेंटिलेटर्स वापराविना पडून असल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे, त्यातही महापौरांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. व्हेंटिलेटरसाठी टाकी उपलब्ध होत नव्हती तर ते वापराविना पडून ठेवण्याऐवजी खासगी रुग्णालयांना का उपलब्ध करून दिले नाही, किमान काही रुग्णांचे प्राण वाचले नसते का, असा प्रश्न त्यांनी केला आहे.
नाशिक : महापालिकेच्या बिटको रुग्णालयात केवळ २३ किलो लिटर्सच्या टाकीअभावी पंधरा व्हेंटिलेटर्स वापराविना पडून असल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे, त्यातही महापौरांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. व्हेंटिलेटरसाठी टाकी उपलब्ध होत नव्हती तर ते वापराविना पडून ठेवण्याऐवजी खासगी रुग्णालयांना का उपलब्ध करून दिले नाही, किमान काही रुग्णांचे प्राण वाचले नसते का, असा प्रश्न त्यांनी केला आहे.
शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असून, फार कमी रुग्णांना आॅक्सिजन किंवा व्हेंटिलेटर लागत असले तरी शहरात आॅक्सिजन बेड किंवा व्हेंटिलेटर लवकर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच बिटको रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्याच्या कारणावरून येथे दाखल रुग्णांना अन्यत्र पाठविले जाते. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात जर व्हेंटिलेटर उपलब्ध झाले नाही तर खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागते, तेथेही असे बेड उपलब्ध होणे कठीण असते. अशावेळी मनपाच्या रूग्णालयात पंधरा व्हेंटिलेटर्स केवळ आॅक्सिजनची टाकी उपलब्ध होत नसल्याने पडून असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात महापौरांनी नाराजी व्यक्त केली. कोरोना टाळण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती होर्डिंग्ज आणि घंटागाडीव्दारे देण्याचे आदेशही महापौरांनी दिले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त आष्टीकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. राजेंद्र त्र्यंबके व डॉ. प्रशांत शेटे आदी उपस्थित होते.
शुक्रवारी (दि.४) महापौरांनी वैद्यकीय विभागाची तातडीची बैठक घेतली. महापौर निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी कोरोनाच्या रुग्णसंख्या आणि उपचारासाठी रुणालये तसेच त्यातील उपचार सुविधांचा आढावा घेतला. शहरातील रुग्णालयात उपलब्ध आॅक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेडची अद्ययावत माहिती घेण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करावी तसेच रोजची ताजी माहिती नागरिकांसाठी खुली करावी, असे निर्देशच महापौर कुलकर्णी यांनी दिले.