छगन भुजबळच भाजपचे शत्रू क्रमांक एक का आहेत ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2022 12:26 AM2022-09-18T00:26:34+5:302022-09-18T00:33:01+5:30
भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरूवात नाशिकपासून केली. पुढील दोन वर्षे निवडणुका एके निवडणुका हाच मंत्र जपायचा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये जोश टिकून राहावा, म्हणून भाजपने लोकसभा मतदारसंघनिहाय नेत्यांवर जबाबदारी सोपविली आहे. नव्या प्रदेशाध्यक्षांनीही संपूर्ण राज्य पिंजून काढायचा संकल्प सोडलाय. सर्वेक्षण, संघटन आणि विजयी होण्याची क्षमता अशा कार्यपद्धतीने निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या भाजपकडे नाशिक जिल्ह्यात तरी एकमुखी नेतृत्व नाही. २०१४ ते २०१९ या काळात स्थानिक मंत्री नव्हता. २०१९मध्ये पाच आमदार निवडून आले असले तरी पहिल्या टप्प्यात कोणालाही मंत्रिपद देण्यात आलेले नाही. गेल्यावेळी जळगावचे गिरीश महाजन पालकमंत्री होते, आता त्यांनाच संधी मिळेल, असे सांगितले जात असले तरी नगरच्या राधाकृष्ण विखे पाटील यांचेही नाव चर्चेत आहे. एकमुखी नेतृत्व नसले तर प्रतिस्पर्धी पक्षातील सक्षम नेतृत्वाला लक्ष्य करा, ही भाजपची व्यूहरचना आहे. बावनकुळे यांनी त्याचा भाग म्हणून भुजबळांना पराभूत करायचे आहे, असे जाहीर आवाहन पक्षाच्या बैठकीत केले.
मिलिंद कुलकर्णी

प्रदेशाध्यक्षांभोवती इच्छुकांचा वेढा
महाराष्ट्र भाजपमध्ये गडकरी आणि फडणवीस गट असल्याची चर्चा आहे. बावनकुळे हे गडकरी गटातील आहेत. २०१९मध्ये मंत्री असूनही त्यांचे विधानसभेचे तिकीट कापले गेले आणि २०२२मध्ये त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. त्यांच्या नाशिक दौऱ्यात गडकरी समर्थक नेते व कार्यकर्ते अग्रभागी होते. मंत्रिपदी वर्णी लागावी, म्हणून काहींचे लॉबिंग सुरू होते. विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या १२ जागांपैकी एखाद्या जागेवर संधी मिळावी, म्हणून काहींचे प्रयत्न सुरू होते. महामंडळे, देवस्थानांच्या विश्वस्त मंडळांसाठी काहींच्या हाती यादी होती. सगळ्यांनी बावनकुळे यांच्यापर्यंत शिफारसपत्रे पोहोचविली. अनुभवी बावनकुळे यांच्या नजरेतून हा प्रकार सुटला नसेल, म्हणून कुणालाही कोणतेही आश्वासन न देता जिल्ह्यातील सर्व ४५६ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट कार्यकर्त्यांनी ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रलंबित कामांना अखेर शिंदे सरकारची चालना
महाराष्ट्रातील शिवसेना शिंदे गट व भाजप सरकारने नाशिकसाठी दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. सरकारचे नाशिककडे लक्ष आहे, हे यातून दिसून आले. १९६६ पासून रखडलेल्या ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पास मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात झाला. एक हजार ४९८ कोटी खर्चास प्रशासकीय सुधारित मान्यता देण्यात आली. दुसरा निर्णय, सिन्नरला वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजूर करण्यात आले. या निर्णयामुळे आता नाशिकची वारी टळणार आहे. यासोबतच केंद्र सरकारकडे अडकून पडलेल्या राज्याच्या प्रकल्पांनाही सत्तांतरानंतर गती मिळेल, अशी चिन्हे दिसत आहेत. पुणे-नाशिक अतिजलद रेल्वेमार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना केली आहे.
खासदार होण्याचे अनेकांना लागले डोहाळे
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला अद्याप १८ महिने बाकी आहेत, मात्र, इच्छुक उमेदवारांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. रोज नवीन नावांची इच्छुक उमेदवारांमध्ये भर पडत आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन मतदारसंघांत, तसेच मालेगावचा समावेश असलेल्या धुळे मतदारसंघावर सध्या शिवसेना शिंदे गट व भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे नव्या युतीच्या तिन्ही उमेदवारांना पुन्हा संधी मिळू शकते, असे आजचे चित्र आहे; परंतु राजकारणात दिवसागणिक समीकरणे बदलत जातात. माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे भाजपमध्ये पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. बावनकुळे यांच्या दौऱ्यात ते अग्रभागी होते. आमदार राहुल ढिकले यांचीही इच्छा असल्याचे मविप्र निवडणुकीच्या वेळी चर्चेत आले होते. माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनीही तयारी चालवली आहे. मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. माणिकराव कोकाटे यांची इच्छा लपून राहिलेली नाही. समीर भुजबळ यांना पुन्हा संधी मिळण्यासाठी छगन भुजबळ प्रयत्न करतील. शांतीगिरी महाराजांचे वास्तव्य नाशिकमध्ये वाढले आहे, त्यांचीही इच्छा आहे.
पुरासोबतच पाणीटंचाई आणि स्वकीयांनीच काढला मोर्चा
नाशिक जिल्ह्यातील १३ तालुक्यांत वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. ढगफुटी व अतिवृष्टीमुळे काही तालुक्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने नुकसान भरपाई म्हणून ११ कोटींचा निधी पाठवला आहे. पावसाळा संपायला १५ दिवस उरले असतानाही पावसाचा जोर कायम आहे. पूल, शेतरस्ते, महामार्ग, नागरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेकदा चर्वितचर्वण झालेला रस्ता डांबरीकरण, दुरुस्ती, त्याची गुणवत्ता या विषयावर पुन्हा एकदा चर्चा झाली. अनेक धरणांमधून विसर्ग सुरू आहे. मात्र नाशिकच्या सातपूरसह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती आहे. भाजपच्या माजी नगरसेवकाने त्यासाठी महापालिकेवर मोर्चा काढला. महापालिकेत पूर्वी सत्ता भाजपची होती, राज्यात भाजप सत्तेत सहभागी आहे, तरीही मोर्चा काढला गेला. वितरणप्रणालीतील त्रुटी असो की अन्य कारणे; मात्र स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात ह्यहर घर जलह्ण पोहोचविण्याची धडपड करावी लागतेय, हे चित्र विसंगत आहे. शासकीय बैठका, मंत्र्यांकडून पाठपुरावा असे उपचार करण्यापेक्षा प्रश्न सोडविण्यासाठी धडक उपायांची गरज आहे.