काँग्रेसचा घसा का बसलाय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 01:36 AM2017-09-03T01:36:05+5:302017-09-03T01:38:23+5:30
गल्ली ते दिल्लीपर्यंत सर्वच ठिकाणी भाजपाचे सरकार वा सत्ता असल्याने काँग्रेसला खरे तर सक्षमपणे विरोधकाची भूमिका निभावण्यासाठी मोठी संधी आहे; परंतु नेतृत्व व कार्यकर्त्यांमध्ये आलेली कमालीची मरगळ पाहता घसा बसल्यागत या पक्षाची अवस्था झाली आहे. अनेकविध मुद्दे असतानाही त्यावर काँग्रेस काही बोलेनासीच आहे. पक्षाच्या संघटनात्मक पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू झाली तरी त्याबाबत कुणाचा फारसा उत्साह दिसू नये, ही या मरगळलेपणाची परिणीती आहे.
साराश/किरण अग्रवाल
गल्ली ते दिल्लीपर्यंत सर्वच ठिकाणी भाजपाचे सरकार वा सत्ता असल्याने काँग्रेसला खरे तर सक्षमपणे विरोधकाची भूमिका निभावण्यासाठी मोठी संधी आहे; परंतु नेतृत्व व कार्यकर्त्यांमध्ये आलेली कमालीची मरगळ पाहता घसा बसल्यागत या पक्षाची अवस्था झाली आहे. अनेकविध मुद्दे असतानाही त्यावर काँग्रेस काही बोलेनासीच आहे. पक्षाच्या संघटनात्मक पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू झाली तरी त्याबाबत कुणाचा फारसा उत्साह दिसू नये, ही या मरगळलेपणाची परिणीती आहे.
निवडणुका नसल्या म्हणून काय झाले किंवा सत्तेत असो वा नसो, पक्षांतर्गत संघटनात्मक निवडीसाठीही रस्सीखेच होण्याची परिस्थिती सर्वच राजकीय पक्षात असताना काँग्रेस मात्र त्यासाठी अपवाद ठरावी, हे काहीसे अजब वा अविश्वसनीय असले तरी खरे वर्तमान आहे. त्यामुळे नाशिक दौºयावर येऊन गेलेल्या राज्याच्या विरोधी पक्ष नेत्यांनी पत्रकार परिषदेद्वारे सत्ताधाºयांवर आरोप करण्यात समाधान मानण्याऐवजी काँग्रेस कमिटीत जाऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना समजून घेतली असती तर ते अधिक बरे झाले असते, असे म्हणता यावे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांतील अपयशाने गारठून गेलेल्या काँग्रेसला पुन्हा सक्रिय करणे खरे तर अवघड नव्हते; परंतु वरिष्ठ नेत्यांमध्येच ती सक्रियता न राहिल्याने ठिकठिकाणचे पदाधिकारी व कार्यकर्ते वाºयावर सुटल्यासारखे झाले आहेत. त्यात गेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीतही पक्षाला फारसे यश मिळवता आले नाही. त्यामुळे आणखीनच उदासीनता वाढीस लागली. खरे तर निवडणुकांमधले यश-अपयश हे येत-जात असते. यशाने उत्साह वाढतो तसे अपयशाने काहीसे नैराश्य येते हे खरे; पण ते क्षणिक असायला हवे. पराभवानंतर त्याच गोष्टीला कवटाळून न बसता पुढील लढाईला सिद्ध व्हायचे असते. परंतु काँग्रेसमध्ये तेच होताना दिसत नाही. लागोपाठच्या पराभवांनी नेतेच असे काही हबकून गेले आहेत की, ते कार्यकर्त्यांत कसला जोश भरणार? सत्तेत असताना काँग्रेस कमिटीची पायरी फारसे न चढणारे नेते आता त्या गल्लीनेही जाताना दिसत नाही, ते त्यामुळेच. काही निवडणुकांत अपयश आले म्हणून काय झाले? ऊठ, लढ... उद्याचा काळ पुन्हा आपलाच आहे, असा आश्वासक दिलासा द्यायला कुणी नाही म्हटल्यावर कार्यकर्ते सैरभैर होणारच ! नाशकातील काँग्रेसची अवस्थाही नेमकी अशीच झाली आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात खुर्ची व पदे उबवलेले नेते घरात घुसून बसले असून, स्वत:खेरीज दुसºयातले कमीपण शोधण्यातच त्यांचा वेळ जाताना दिसत आहे. अशात कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जितावस्था कोण आणेल, हा खरा प्रश्न आहे. बरे, पराभव हा नैराश्याचा कारक घटक असला तरी पक्ष-संघटनात्मक कार्य वाढविण्यासाठी व लोकांसमोर जाण्यासाठी विरोधकाची भूमिका वाट्याला आलेली असणेही लाभदायीच असते. त्यातही केंद्र व राज्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांतही विरोधकांची सत्ता असल्याने तर काँग्रेसला असे अनेक मुद्दे लाभणारे आहेत की ज्यावर रोज उठून आंदोलने केलीत तरी ती कमी ठरावीत. पण रस्त्यावर उतरायला कार्यकर्ते हवेत, त्यांचीच उणीव या पक्षाला भेडसावते आहे. केंद्र व राज्यस्तरीय विषयांचे जाऊ द्या, स्थानिक महापालिकेतील कारभार बघितला तर त्यावरूनही आपले अस्तित्व दर्शवून देता यावे, इतके विषय हाती लागणारे आहेत. कशाला, अपंगाचा निधी राखीव असतानाही त्यांच्यासाठी काही केले जात नाही म्हणून विदर्भातले आमदार बच्चूू कडू येथे येऊन महापालिकेत सर्वांना धारेवर धरून जातात. त्यातून आतापर्यंत येथे अस्तित्वात नसलेल्या त्यांच्या ‘प्रहार’ संघटनेची रुजुवात होऊन जाते. परंतु काँग्रेस आदि पक्षांना त्यातले गांभीर्यच लक्षात आले नाही. महापालिकेच्याच करवाढीसारख्या मुद्द्यावर शिवसेना ज्या आक्रमकतेने पुढे आलेली दिसली तशी काँग्रेस सरसावली नाही. स्वाइन फ्लू, डेंग्यूचे बळी पडत आहेत, आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरते आहे; महापालिकेकडे स्वत:चे अभियंते असताना रस्ते नियोजनासाठी सल्लागार संस्था नेमण्याचे व त्यावर तब्बल ४० कोटी रुपये खर्चाचे घाटत होते, ऊठसूट प्रत्येक काम खासगीकरणातून करण्याचे ठराव होत आहेत, काँग्रेसच्याच सत्ताकाळात झालेल्या अनेक प्रकल्पांची दुर्दशा झाली आहे, असे अगणित विषय आहेत ज्यावर रान पेटवता येऊ शकणारे तर आहेच; पण निरुत्साही झालेल्या कार्यकर्त्यांना सक्रियही करता येणारे आहे. त्यातून कार्यकर्त्यांची प्रतिमा तर उंचावेलच, शिवाय पक्षाचे अस्तित्वही अधोरेखित होईल. पण, अशा अनेक विषयांवर ‘आप’ व ‘माकपा’दी पक्ष आंदोलने करीत असताना काँग्रेसच्या पातळीवर काही हालचालच होताना दिसत नाही, जणू काँग्रेसचा ‘घसा’ बसलाय ! विशेष म्हणजे, सत्ता नसली तरी संघटनेतल्या पदांसाठी एरव्ही हमरी-तुमरी करणारे पदाधिकारी-कार्यकर्ते यंदा त्यासाठीही उत्सुकता दाखवताना दिसत नाहीत. काँग्रेसच्या पक्ष पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू झाली असली तरी साधी प्राथमिक सभासद नोंदणी करण्यासही फारसा कुणी रस दाखविलेला नाही. यासंदर्भात एकदा येऊन गेलेले पक्ष निरीक्षक रविशंकर झा नंतर फिरकलेले नाहीत, त्यामुळे त्यांची प्रतीक्षा सर्वांना आहे. परंतु गेल्यावेळी आकाश छाजेड यांना शहराध्यक्षपदी नेमल्यावर व नंतर त्यांचे अध्यक्षपद काढून घेत शरद आहेर यांच्याकडे प्रभारी कामकाज सोपविल्यानंतर, म्हणजे या दोघांच्या विरोधात समांतर काँग्रेस चालविणारेही नव्या निवडीबाबत हालचाल करताना दिसत नाहीत अशी वा एवढी निष्क्रियता या पक्षात आली आहे. सध्याच्या गणेशोत्सवानिमित्त नेहमीप्रमाणे सरकार विरोधातील मुद्द्यांची व्यंगात्मक आरास मांडणाºया या पक्षाने सदर एकेका मुद्द्यांवरच रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली असती, तरी आज एवढी नादारी ना दिसती; परंतु ना नेतृत्व उरले, ना कार्यकर्ते, अशी या पक्षाची अवस्था झाली आहे. त्यामुळेच राज्याचे विरोधी पक्षनेतेपद सांभाळणाºया राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारख्या नेत्यांना पक्ष कार्यालयात येण्याऐवजी शासकीय विश्रामगृहावर जाऊन पत्रकार परिषद घ्यावी लागली. सत्तेतील पहारेकरी झोपले आहेत, अशी टीका त्यांनी सत्ताधाºयांवर केली. पण, सत्तेबाहेरचे पहारेकरी तरी कुठे जागे आहेत? ते तर अधिक गाढ झोपेत आहेत. तेव्हा विखे-पाटील यांनी काँग्रेस कमिटीत जाऊन त्या झोपलेल्यांना जागे केले असते तर पक्षातील मरगळ झटकली जाण्यात काही मदत झाली असती; परंतु तसे होऊ शकले नाही. नाशिकनजीकचे व नाशिकचे पालकत्व यापूर्वी सांभाळलेले माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर इकडे फिरकले नाहीत. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाने त्यांची नेमणूक केली आहे हे चांगलेच झाले; पण सोबत येथल्या गलितगात्र झालेल्या पक्षाला सावरण्याचे कामही त्यांनी केले असते तर किती बरे झाले असते ! पण तसेही होताना दिसत नाही.