'ठाकरे सरकारातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांना वेगळा न्याय का?,' भाजप आध्यात्मिक आघाडी आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 11:37 AM2021-07-21T11:37:09+5:302021-07-21T11:41:53+5:30
Jitendra Awhad : मंदिरे बंद असतानाही आव्हाड यांनी नाशिकमधील मंदिरात केली होती आरती. जितेंद्र आव्हाड सोडून सभोवतालच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल.
नाशिक : राज्य सरकारने अद्यापही मंदिरे उघडण्याची परवानगी नसताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाशिकच्या नवश्या गणपती मंदिरात आरती केली. मात्र, त्यांना सोडून त्यांच्या भोवतालच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी नाराजी व्यक्त केली असून ठाकरे सरकारातील मंत्र्यांना वेगळा न्याय असतो का असा प्रश्न केला आहे.
त्यामुळे राज्य सरकारने अद्यापही सर्व निर्बंध काढून टाकलेले नाहीत विशेषतः धार्मिक स्थळे पूर्णतः बंद आहे मठ मंदिरे उघडे द्यावी यासाठी भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. त्यावर अर्थकारण असलेल्या घटकांची उपासमार होत आहे. मात्र, असे असतानाही ठाकरे सरकार मंदिर उघडण्यास परवानगी देत नाही. मात्र दुसरीकडे गेल्या रविवारी नाशिक मध्ये आलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी आनंदवली परिसरातील नवश्या गणपती येथे गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले. तसेच कार्यकर्त्यांसमवेत आरती देखील केली. सोशल मीडियावर या संदर्भात व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पाच कार्यकर्त्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
मात्र जितेंद्र आव्हाड यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे तुषार भोसले यांनी ठाकरे सरकार मधील मंत्र्यांना वेगळा आणि सर्व सामान्य नागरिकांना वेगळा कायदा असतो का असा प्रश्न केला आहे तसेच जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी पोलीस आयुक्तांची भेट घेण्यात येणार असून गुन्हा दाखल केला नाही तर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही आचार्य भोसले यांनी दिला आहे.