पॅसेंजर रेेल्वे अद्यापही लॉक का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:20 AM2021-08-19T04:20:00+5:302021-08-19T04:20:00+5:30
नाशिकरोड : कोरोनामुळे रेल्वे प्रशासनाने फक्त एक्स्प्रेस व लांब पल्ल्याच्या रेल्वे या स्पेशल रेल्वे म्हणून सुरू केल्या असून, कन्फर्म ...
नाशिकरोड : कोरोनामुळे रेल्वे प्रशासनाने फक्त एक्स्प्रेस व लांब पल्ल्याच्या रेल्वे या स्पेशल रेल्वे म्हणून सुरू केल्या असून, कन्फर्म आरक्षण तिकिटाशिवाय प्रवास करता येत नाही. रेल्वे प्रशासनाने सर्वसाधारण तिकीट असलेल्या पॅसेजर दर्जाच्या रेल्वे अद्याप लॉक करून ठेवल्याने सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
दीड वर्षापूर्वी कोरोना संसर्गाची भारतात लागण सुरू झाल्यानंतर प्रारंभीचे चार महिने सर्व प्रवासी रेल्वेगाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर परराज्यातील प्रवाशांना आपापल्या गावी जाण्यासाठी काही प्रमाणात रेल्वे सुरू करण्यात आल्या. गेल्या वर्षभरात रेल्वे प्रशासनाने हळूहळू करत सर्वच एक्स्प्रेस व लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरू केल्या आहेत. पूर्वीचे रेल्वे क्रमांक बदलून त्याच रेल्वेना नवीन क्रमांक देऊन स्पेशल रेल्वे म्हणून चालविल्या जात आहेत. रेल्वेमध्ये प्रवास करताना कन्फर्म आरक्षण तिकीट असल्याशिवाय प्रवास करता येत नाही.
कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने सर्वसाधारण तिकीट बंद करून टाकले आहे. त्यामुळे पॅसेजर दर्जाच्या सर्व रेल्वे गेल्या दीड वर्षापासून बंद आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली मनमाड - इगतपुरी शटल तसेच देवळाली - भुसावळ शटल, मुंबई - भुसावळ पॅसेंजर या तीनही पॅसेंजर दर्जाच्या रेल्वे बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हांतर्गत व नाशिक, मुंबई जिल्ह्यातून भुसावळ, जळगाव मार्गावर जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सर्वसाधारण तिकिटाच्या पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने प्रवाशांना लांब पल्ल्याच्या रेल्वेने आरक्षण कन्फर्म तिकीट काढून जावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कोरोना संसर्गातून सर्वत्र परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आली असतानासुद्धा रेल्वे प्रशासन पॅसेंजर गाड्यांना गर्दी होते म्हणून पॅसेंजर दर्जाच्या गाड्या सुरू करत नाही. मात्र दुसरीकडे लांब पल्ल्याच्या रेल्वेला कन्फर्म आरक्षण तिकीट देऊन संपूर्ण बोगी भरून प्रवासी प्रवास करत आहेत. तेव्हा कोरोनाच्या नियमापैकी एकमेकांत सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे असताना लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये तो नियम सर्रासपणे पायदळी तुडवला जात आहे. फक्त पॅसेंजर रेल्वेला गर्दी होते म्हणून पॅसेंजर बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वे
नाशिकरोड रेल्वेस्थानक व नाशिक जिल्हामार्गे धावणाऱ्या मनमाड-इगतपुरी शटल, देवळाली-भुसावळ शटल व भुसावळ-मुंबई पॅसेंजर बंद आहेत.