‘त्या’ जागेवरचा हक्क आम्ही का सोडायचा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:19 AM2021-09-10T04:19:39+5:302021-09-10T04:19:39+5:30
नांदगाव : आपण ‘त्या’ जागेवरून उठलो तर.... त्या जागी दुसरा कोणी बसणार नाही ना? अशी भीती व्यावसायिकांच्या मनात नेहमीच ...
नांदगाव : आपण ‘त्या’ जागेवरून उठलो तर.... त्या जागी दुसरा कोणी बसणार नाही ना? अशी भीती व्यावसायिकांच्या मनात नेहमीच असते. तिला आधारही आहे. अतिक्रमण हटविल्यानंतर काही वर्षांतच ती जैसे थे झाल्याचा इतिहास आहे. हे एकदा-दोनदा नव्हे तर चार-पाच वेळेस घडले आहे. मग आपला ‘त्या जागेवरचा हक्क’ का सोडायचा या मानसिकतेतून व्यावसायिक जागा सोडायला तयार होत नाहीत. यात चूक राजकारण्यांची व प्रशासनाची आहे.
मतांच्या बेरजेत अतिक्रमणधारकांचा पैसा व मतांचा गठ्ठा यातून मोठा खेळ खेळला जातो. एकाने टपरी टाकली की शेजारी दुसरा टाकतो. अशी रांग तयार होत जाते. अर्थात नगरपरिषदेच्या राजकारणात उत्सुक असलेली मंडळी त्यामागे असते. ही बाब लपून राहिलेली नाही. २००९ च्या पुरात शनी मंदिरालगतची अतिक्रमणे जमीनदोस्त झाली होती. त्यानंतर त्याठिकाणी सुंदर बगीचा तयार केला गेला. तिथे अतिक्रमणे झाली नाहीत. असे पर्याय आहेत. त्यावर विचार करायला हवा.
पर्यायी जागा उपलब्ध करून दिली तर त्याठिकाणी जाण्याची व्यावसायिकांची तयारी नसते. वर्षानुवर्षे ज्या जागेवर बसलो आहे, तिथेच धंदा होईल, असे त्यांना वाटत असते. प्रशासन काही दिवस शिस्त लावण्याचा प्रयत्न करते. त्यांचा दंडुका खाली आला की लोक नव्या दमाने रस्त्यावर येतात. चार कोटींच्या पुलावरची अतिक्रमणे या सिरीयलमधली आहेत.
-------------------------
नुकसानीसाठी भरपाईची तरतूद नाही
नुकसानीचे पंचनामे सुरू असून अतिक्रमणधारकांच्या नुकसानीसाठी भरपाईची तरतूद नाही. २००९ च्या पुरात सापडलेल्या काही व्यावसायिकांनी नंतर आपले व्यवसाय दुसरीकडे व कायदेशीर जागेत सुरू केले होते. ते हुशार ठरले. ज्यांनी जागा सोडल्या नाहीत त्यांचेवर आलेली वेळ पुन: पुन्हा येऊ शकते हे तरी लक्षात घ्यायला हवे. अजून ही सुधारण्याची संधी आहे. अन्यथा कमवा आणि गमवा अशा परिस्थितीला तोंड देण्याची तयारी ठेवा असा संदेश २०२१ च्या पुराने दिला आहे. असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.