का वाढतंय नाशिकचं तपमान?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:44 AM2018-06-05T00:44:52+5:302018-06-05T00:44:52+5:30
गेल्या वर्षापेक्षा या वर्षाचा उन्हाळा अधिक तीव्र का? का तपमान व उष्णता वाढत आहे? प्रत्येकजण हा प्रश्न विचारत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे काय समस्या उद्भवणार? महाराष्ट्रातील चंद्रपूर, मालेगाव यांसारखी शहरे तर अक्षरश: भाजून निघत आहेत. ४४ पासून ते ४७ अंश से.पर्यंत असह्य तपमानाशी सर्वांनाच सामना करावा लागत आहे. विशेषत: उत्तर महाराष्टतील सर्वाधिक थंड ठिकाण असलेल्या नाशिकमध्ये इतके तपमान कधीच नव्हते, असा अनुभव नागरिक सांगतात. यंदा तर मे ऐवजी एप्रिल महिन्यातच पारा चाळिशीपर्यंत पोहोचला होता. ४०-५० वर्षांपूर्वीचे नाशिक हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध होते. म्हणूनच देवळाली येथे आर्टिलरी सेंटर सुरू केले होते. नाशिकच्या अवतीभवती जंगलं होती. नाशिकची लोकसंख्या मर्यादित होती. लोकसंख्या झपाट्याने वाढली. नगरपालिकेची महानगरपालिका झाली. झपाट्याने शहराचा विकास झाला. मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले. दोन औद्योगिक वसाहती सुरू झाल्या. प्रदूषणाचे प्रमाण वाढले. शहराचा लोकसंख्या वाढीमुळे विस्तार झाला. शेतजमिनीत सीमेंटची जंगलं झपाट्याने वाढत आहेत. प्रदूषण कमालीचे वाढले. लोकांचे राहणीमान वाढले. या सर्व बदलत्या जीवनशैलीमुळे नाशिक शहराचे तपमान वाढू लागले आहे.
- प्राचार्य डॉ. किशोर पवार
नाशिक शहर तसे खूपही मोठे नाही, परंतु मोटारींचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सायकल वापरणारी माणसं स्वयंचलित दुचाकी, चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात वापरू लागले. पेट्रोल, डिझेलसारख्या जीवाश्म इंधनाचा भरमसाठ वापर सुरू झाला. त्यामुळेही मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण सुरू झाले. कार्बनडाय आॅक्साईड वायूचे प्रमाण पर्यावरणात कित्येक पटीने वाढले. त्याबरोबरच कार्बन मोनाक्साईड वायू, धूळ, धूर नायट्रोजन डायआॅक्साईड वायू यांसारख्या विषारी वायूंचे प्रमाण हवेत वाढले. तपमान वाढीला प्रामुख्याने कार्बनडाय आॅक्साईड वायू हा हरितगृह वायू मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. त्याचप्रमाणे ४० टक्क्याने वाढले. वनांच्या ºहासामुळे हा अतिरिक्त कार्बनडाय आॅक्साईड वायू वनस्पती प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेसाठी शोषून घेऊ शकत नाही. सूर्यापासून येणारी उष्णता पृथ्वीवर येऊन पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. ही उष्णता वातावरणात कार्बनडाय आॅक्साईडमुळे उत्सर्जित होत नाही. हा वायू काचेसारखे काम करतो. त्यामुळे भूतलावरील उष्णता रोखून धरली जाते.
सीमेंटच्या इमारती...
सूर्याच्या उष्णतेमुळे सीमेंटच्या इमारती मोठ्या प्रमाणात तापतात. रात्री त्या वातावरणात उष्णता सोडतात. त्यामुळे तपमान वाढते. आता नाशिकमध्ये मुंबई, सिंगापूर यांसारख्या अनेक मजली इमारती उभारल्या जात आहेत. त्यामुळे ही समस्या कित्येक पटीने वाढत आहे. आज मोठ्या प्रमाणात चार पदरी, सहा पदरी महामार्ग होत आहेत. मोठ्या प्रमाणात रस्ते बांधणीसाठी डांबर, काँक्रीट वापरले जाते. काळा रंग उष्णता अधिक शोषतो. त्यामुळे हे रस्ते खूप तापतात व रात्री उष्णता उत्सर्जित करतात. असे रस्ते लवकर थंड होत नाही. पर्यायाने तपमान वाढते. वातानुकूलित यंत्रणा, पंखे, कुलरदेखील थिटे पडतात.