नाशिकरोड रेल्वेस्थानकावर वायफाय सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 01:31 AM2018-04-01T01:31:49+5:302018-04-01T01:31:49+5:30
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येत असून, गत कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकरोड रेल्वेस्थानकाचा चांगलाच कायापालट झाला आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर प्रवाशांसाठी इंटरनेट वाय-फाय सुविधांचे काम पूर्ण झाले असून, प्रवाशांसाठी नुकतीच कार्यान्वित झाली आहे.
मनोज मालपाणी ।
नाशिकरोड : रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येत असून, गत कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकरोड रेल्वेस्थानकाचा चांगलाच कायापालट झाला आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर प्रवाशांसाठी इंटरनेट वाय-फाय सुविधांचे काम पूर्ण झाले असून, प्रवाशांसाठी नुकतीच कार्यान्वित झाली आहे. रेल्वेच्या भुसावळ विभागामध्ये मॉडेल स्टेशन स्वच्छतेसंदर्भात नाशिकरोड रेल्वेस्थानकातून दररोज १८ ते २० हजार प्रवासी ये-जा करतात. गत कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकरोड रेल्वेस्थानकाचा मोठ्या प्रमाणात कायापालट झाला असून, प्रवाशांसाठी विविध सोयी-सुविधा निर्माण झाल्या आहेत. नवीन चौथा प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून प्लॅटफॉर्म क्रमांक चारपर्यंत नवीन पादचारी पूल, नवीन-जुना पादचारी पूल एकमेकांना जोडणे, संपूर्ण रेल्वेस्थानक परिसरात एलईडी दिवे, सिन्नर फाट्याकडून रेल्वेने नवीन प्रवेशद्वार, सिन्नर फाट्याला चौथ्या प्लॅटफॉर्मशेजारी मोठा सर्क्युलेट एरिया, प्रतीक्षागृहाचे नूतनीकरण आदी प्रवाशांसाठी नवीन सोयी उपलब्ध झाल्या आहेत. तर रेल्वे प्रशासनाच्या दृष्टीने अनेक तांत्रिक अडचणी, समस्या दूर करण्यात आल्या आहेत. यामुळे नाशिकरोड रेल्वेस्थानकाने कात टाकली आहे. काही महिन्यांपूर्वी वयोवृद्ध, अपंग, आजारी प्रवाशांसाठी लिफ्टचीदेखील सुविधा सुरू करण्यात आली आहे. तर सरकत्या जिन्याचे कामदेखील प्रगतिपथावर सुरू आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर प्रवाशांकरिता गेल्या काही महिन्यांपासून रेलटेल कॉर्पोरेशन आॅफ इंडिया प्रा. लि. (आरसीआयएल) यांच्या माध्यमातून वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू होते. चारही प्लॅटफॉर्म शेडमध्ये ५० बाय ३० मीटर क्षेत्राची रेंज असलेले १९ आउटडोअर हॉटस्पॉट लावण्यात आले आहे. तर प्रतीक्षागृह, तिकीटघर, आरक्षण कार्यालय, व्हीआयपी रूम आदी ठिकाणी ११ इनडोअर हॉटस्पॉट लावण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. हॉटस्पॉट लावण्याचे काम दोन दिवसांपूर्वीच पूर्ण झाले असून, त्यांची चाचणी घेऊन प्रवाशांसाठी कार्यान्वित झाले आहे. यामुळे नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या मुकुटामध्ये ‘वायफाय’चा तुरा रोवला गेला आहे.
वायफाय कनेक्टसाठी
रेल्वेस्थानकांवर मोफत वायफाय सुविधा मिळविण्यासाठी प्रवाशांनी मोबाइलमध्ये वायफाय सुरू केल्यानंतर ‘रेल्वेवायर वायफाय’वर क्लिक करून स्वत:चा मोबाइल क्रमांक टाईप करून टाकायचा. त्यानंतर लागलीच मोबाइलवर ओटीपी (वनटाईम पासवर्ड) क्रमांकाचा मेसेज येईल. तो ओटीपी क्रमांक प्रवाशांसाठी पासवर्ड असणार असून, त्याद्वारे मोफत वायफाय सेवा रेल्वेस्थानकावर सर्वच प्रवाशांना मिळणार आहे. मात्र मोफत वायफाय सुविधा ही जास्तीत जास्त सलग पाउण ते एक तास मिळणार असून त्यानंतर मात्र डाउनलोड, अपलोड करता येणार नाही. रेल्वेस्थानकावर येणाऱ्या सर्व प्रवाशांना सुविधा मिळाव्यात तसेच कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.