पारंपरिक शाहीमार्गाचे रुंदीकरण बारगळणार
By Admin | Published: December 17, 2014 12:29 AM2014-12-17T00:29:09+5:302014-12-17T00:29:30+5:30
पर्यायी मार्ग : मुख्यमंत्र्यांकडे लोकप्रतिनिधींचा रेटा
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात पर्वणीकाळासाठी काट्या मारुती चौक ते गणेशवाडी व्हाया गौरी पटांगण असा पर्यायी मार्ग सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी सुचविल्याने परंपरागत शाहीमार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव जवळपास बारगळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. साधू-महंतांनी परंपरागत शाहीमार्गाचाच आग्रह कायम ठेवला असला तरी मागील सिंहस्थात झालेली दुर्घटना लक्षात घेता प्रशासनाला उचित सहकार्य करण्याचीही भूमिका घेतली आहे.
मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात परंपरागत शाहीमार्गावरील सरदारचौकातील उतारावर शाही मिरवणुकीच्या वेळी चेंगराचेंगरीची घटना होऊन ३२ भाविकांचे बळी गेले होते. त्यानंतर गेल्या अकरा वर्षांत परंपरागत शाहीमार्गाच्या रुंदीकरणाचा विषय वारंवार चर्चेत राहत आला आहे. दुर्घटनेनंतर शासनाने नेमलेल्या रमणी आयोगानेही रस्ता रुंदीकरणाची शिफारस केली तर पोलीस प्रशासनानेही रुंदीकरणाची सूचना महापालिका व जिल्हा प्रशासनाला केली.
त्यानुसार आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर परंपरागत शाहीमार्गाचा रुंदीकरणाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भूसंपादनाकरिता अंदाजित निवाडा होऊन महापालिकेकडे २५ कोटी ५२ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार परंपरागत शाहीमार्ग ९, १२ आणि १५ मीटर रुंद विकास योजना राबविण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने पहिला हप्ता म्हणून ८ कोटी ४१ लाख रुपयांना मंजुरी देत त्यातील ५ कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाला अदाही केले आहेत.