मालेगावी मास्क वापराकडे सर्रास दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:17 AM2021-08-12T04:17:33+5:302021-08-12T04:17:33+5:30
मालेगाव : शहरातून कोरोना गेला असे म्हणत काही नागरिक गाफील असून, शहरातील बहुसंख्य नागरिक मास्क वापरत नसल्याचे दिसून आले. ...
मालेगाव : शहरातून कोरोना गेला असे म्हणत काही नागरिक गाफील असून, शहरातील बहुसंख्य नागरिक मास्क वापरत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे कोरोनाला नियंत्रणात आणणाऱ्या आरोग्य विभागाला सर्कस करावी लागत असून नागरिकांना समजावून सांगावे लागत आहे. शहरात बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू लागली असून, नागरिक कोरोनाचे नियम पाळत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. देशासह जग तिसऱ्या लाटेपासून कसा बचाव करता येईल या चिंतेत असताना शहरात मात्र नागरिक तोंडाला मास्क न लावता वावरत आहेत. त्यामुळे कमी झालेली बाधितांची संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मालेगाव महापालिका अंतर्गत दुसऱ्या लाटेत सुमारे दोन हजारांवर बाधित होते. आता त्यावर आरोग्य विभागाने नियंत्रण मिळवत शहरात केवळ बाधितांची संख्या ३८ वर आली आहे, तर तालुक्यातील ग्रामीण भागातील बाधितांची संख्या ५२ झाली आहे. दोन्ही मिळून तालुक्यात आज कोरोनाबाधितांची संख्या ९० इतकी आहे. आतापर्यंत तालुक्यात ९ हजार ५८ बाधित मिळून आले आहेत, तर मालेगाव महापालिका क्षेत्रातून ३५७ जणांचा बळी गेला आहे. मोसम पूल भागात असलेल्या सिग्नलवरही मोठ्या संख्येने नागरिक मास्क न वापरता गर्दी करून असतात. राज्यात सर्व कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना मालेगाव महापलिका आरोग्य विभागाने गेल्यवर्षी आणि यंदादेखील दोनवेळा कोरोनावर नियंत्रण मिळविले असून, आरोग्य विभाग तिसऱ्या लाटेस सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल दुसाने यांनी सांगितले.
-----------------------------
चेक नाके उभारून तपासणी
मालेगाव मनपा आरोग्य विभागातर्फे कारोना प्रतिबंधासाठी जनजागृती करण्यात येत असून, नागरिकांना मास्कचा वापर करण्याचे व सुरक्षित आंतर ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. चेक नाके उभारून नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. बाधितांना उपचारार्थ दाखल करण्यात येत आहे. मास्क न वापरणाऱ्या काही जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांना तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले जात आहे. शासकीय कार्यालयांमध्ये पोस्टर लावण्यात येत असून, लसीकरण वेगात सुरू असल्याचे मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. अमाेल दुसाने यांनी सांगितले.