शहरात नायलॉन मांजाची सर्रास विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:19 AM2020-12-30T04:19:19+5:302020-12-30T04:19:19+5:30
शहरात विशेषतः पंचवटी व रविवार कारंजा, भद्रकाली परिसरात असलेल्या काही दुकानात नायलॉन मांजाची विक्री केली जात असून, काही ठिकाणी ...
शहरात विशेषतः पंचवटी व रविवार कारंजा, भद्रकाली परिसरात असलेल्या काही दुकानात नायलॉन मांजाची विक्री केली जात असून, काही ठिकाणी सर्रास तर काही ठिकाणी चोरी, छुप्या पद्धतीने विक्री सुरू आहे. नायलॉन मांजाची किंमतही अधिक असून, तो सहजासहजी तुटत नाही. त्यामुळे पतंग शौकिनांकडून त्याची मागणी वाढती आहे, परंतु या मांजामुळे होणारे दुष्परिणामही गंभीर स्वरूपाचे असून, त्याकडे मात्र कानाडोळा केला जात आहे. एकीकडे नायलॉन मांजा वापरू नका, असे प्रशासन आवाहन करीत असताना, दुसरीकडे पतंग विक्री करणाऱ्या व्यावसायिकांकडून सर्रासपणे नायलॉन मांजा विक्री केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी उड्डाणपुलावरून जाणाऱ्या महिलेचा गळा नायलॉन मांजाने चिरला गेल्याने त्या महिलेला जीव गमवावा लागला. दरवर्षी नायलॉन मांजाचा पतंगोत्सवात वापर केला जातो. त्यामुळे पक्षींच्या जीविताला धोका तर होतोच, परंतु अबाल, वृद्धांनाही या मांजामुळे गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्याच्या घटना आजवर घडल्या आहेत. दरवर्षी पोलिसांकडून नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करून मांजा जप्त केला जातो, परंतु पुढच्या वर्षी पुन्हा हा मांजा वापरात आणला जात असून, दरवर्षीच्या या दुखण्यावर प्रशासन काय कडक उपाययोजना आखते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.