पत्नी, मित्रावर गोळीबार करणाऱ्यास सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 01:04 AM2018-08-29T01:04:18+5:302018-08-29T01:06:02+5:30
चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व वाढदिवसासाठी घरी आलेल्या मित्रावर गोळीबार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी दीपक ऊर्फ सोनू अशोक परदेशी (रा़ साईराम रो-हाउस, म्हाडा कॉलनी, पाथर्डी शिवार) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ सी़ खटी यांनी सोमवारी (दि़२७) पाच वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़
नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व वाढदिवसासाठी घरी आलेल्या मित्रावर गोळीबार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी दीपक ऊर्फ सोनू अशोक परदेशी (रा़ साईराम रो-हाउस, म्हाडा कॉलनी, पाथर्डी शिवार) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ सी़ खटी यांनी सोमवारी (दि़२७) पाच वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ १८ आॅगस्ट २०१६ रोजी घडलेल्या या घटनेत सरकारी वकील कल्पक निंबाळकर यांनी न्यायालयात आठ साक्षीदार तपासून आरोपीविरोधात सबळ पुरावे सादर केले होते़ आरोपी दीपक परदेशी यास पत्नी कोमलच्या चारित्र्यावर संशय होता़ १८ आॅगस्ट २०१६ रोजी दीपकचा वाढदिवस असल्याने त्याचा मित्र नागेश्वर बंगाली ठाकूर (रा़शांतीनगर, माडसांगवी) हा मित्रांसह केक घेऊन रात्रीच्या वेळी पार्टी करण्यासाठी घरी गेला होता़ रात्री केक कापल्यानंतर सर्व मित्रांनी दारू घेतली व निघून गेले़ मात्र, ठाकूर हा परदेशीच्या घरीच थांबलेला होता़ परदेशीची पत्नी कोमल ही ठाकूर यास मामा मानत होती़ रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून दीपक याने पत्नी कोमलसोबत भांडण सुरू केले़ पती-पत्नीमधील भांडण विकोपाला गेल्यानंतर परदेशी याने बॅगमधून गावठी कट्टा काढून पत्नीवर एक तर ठाकूरवर दोन गोळ्या झाडल्या़ यामध्ये पत्नीच्या डोक्यात गोळी घुसल्याने ती गंभीर जखमी झाली तर ठाकूरच्या गळ्यास व गालास गोळ्या चाटून गेल्या़ यानंतर ठाकूर याने आरडाओरड केल्याने परदेशी यास पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले़