डॉक्टरला मारहाण करत पत्नीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:16 AM2021-04-28T04:16:38+5:302021-04-28T04:16:38+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अमोल सिंग परदेशी यास पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास कंबरदुखीचा अचानकपणे त्रास सुरू झाला. ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अमोल सिंग परदेशी यास पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास कंबरदुखीचा अचानकपणे त्रास सुरू झाला. त्यावेळी त्यांनी डॉक्टरांना फोन करून घरी येण्यास सांगितले, परंतु कंबरदुखीचा आजार तातडीचा नसल्याने व संशयित हा नेहमी दारूच्या नशेत असल्याने फिर्यादी पीडित महिला यांचे डॉक्टर पती त्यांच्या घरी उपचारासाठी गेले नाही. या कारणावरून संशयित आरोपी परदेशी याने त्यांच्या डॉक्टर पती यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच कापून टाकीन, गोळ्या घालेन, या प्रकारची धमकी दिली. त्यांना सोडविण्यासाठी गेलेल्या यांच्या पत्नी यांनाही संशयित परदेशी याने ढकलून देत, त्यांनी परिधान केलेला पंजाबी ड्रेस कुर्ता फाडून हाताच्या चापटीने मारहाण केली. स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून पोलिसांनी परदेशी या विरोधात वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यास प्रतिबंध नियम अधिनियम २०१०च्या कलम ४ प्रमाणे, तसेच विनयभंगप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.