...अन् तो एकटाच निघाला तिच्यासोबत अखेरच्या यात्रेला; नाशकात पत्नीचा अपघाती मृत्यू, तरुण सुन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 01:08 PM2024-12-09T13:08:38+5:302024-12-09T13:10:48+5:30
परक्या प्रदेशात भाविक पर्यटक म्हणून आलेल्या मुपल्ला या युवकावर अचानकपणे दुःखाचा डोंगर कोसळला अन् तो भांबावून गेला.
अझहर शेख, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक |
मोठ्या आनंदात एकमेकांचा हात धरून देवदर्शनाला निघालेले जन्माचे सोबती. आंध्र प्रदेशातले घर सोडून एकमेकांच्या साथीने हे दोघे नाशिकला पोहोचले, पण काळाने घात केला.. ती त्याला नाशकात सोडून कायमची निघून गेली.. आणि तो स्वतःशी विचारतो की, तिचे मृत शरीर सोबत घेऊन एकटाच घरी कसा जाऊ..?
शिर्डीतून सायंकाळी निघालेले ते दोघे शहरातील महामार्ग बसस्थानकावर शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बसमधून उतरले. त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी बसची चौकशीकरिता हे दोघेही त्या बसच्या समोरून ओट्यावरून जात होते. याचवेळी अचानकपणे फलाटावरून बस वेगाने स्थानकात शिरली अन् अंजली या धडकेत गंभीर जखमी होऊन गतप्राण झाली. या दुर्घटनेमुळे ती क्षणात वेगळ्या प्रवासाला निघून गेली, एकटीच ! त्यांचा जीवन'प्रवास' अर्ध्यावरच एका अपघाताने थांबवला. या हृदयद्रावक दुर्घटनेने सारेच हळहळले.
परक्या प्रदेशात भाविक पर्यटक म्हणून आलेल्या मुपल्ला या युवकावर अचानकपणे दुःखाचा डोंगर कोसळला अन् तो भांबावून गेला. भिरभिरत्या नजरेने तो जिल्हा रुग्णालयातील माणसे न्याहाळू लागला. मातृभाषेचा अपवाद वगळता केवळ इंग्रजी येत असल्याने संवाद साधण्याची अडचण झाली. पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून जिल्हा रुग्णालयात त्याने रात्र काढली. पोलिसांनी मरणोत्तर पंचनाम्याची प्रक्रिया आटोपली. सकाळी महामंडळाचे कर्मचारी रुग्णालयात पोहोचले. शवविच्छेदनासह सर्व शासकीय कागदपत्रांची पूर्तता करण्यास मुपल्ला यास कर्मचारी- अधिकारी यांनी मदतीचा हात दिला. रुग्णवाहिकेतून (एम.एच१५ एचएच ४४१२) दुपारी दोन वाजता सायरनच्या आवाजात त्यांचा आंध्र प्रदेशच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
...जणू आसवे कोरडी पडली
बस दुर्घटनेत पत्नीची साथ कायमची गमावलेल्या मुपल्ला नागार्जुन या युवकाने परतीचा प्रवास तिचा मृतदेह सोबत घेत घराकडे एकट्याने करायचे ठरविले. सुमारे १२०० कि.मी.चा परतीचा प्रवास रविवारी जिल्हा रुग्णालयामधून पत्नीच्या मृतदेहासोबत रुग्णवाहिकेने सुरू झाला. यावेळी तिशीतल्या युवकाचा कंठ भरून येत होता; मात्र डोळ्यांतील आसवेही जणू कोरडी पडली होती. त्याचे कोणत्या भाषेत कोण, कसे सांत्वन करणार होते.
लग्नाला अवघे अडीच वर्षे...!
लग्नाला जेमतेम अडीच वर्षे झालेल्या अंजली व मुपल्ला यांनी एकमेकांच्या साथीने यापूर्वीही विविध शहरांत पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला. आंध्र ते नाशिकपर्यंतचा या जोडप्याचा प्रवासही अत्यंत आनंदाचा होता. मात्र, नाशिकच्या बसस्थानकावर झालेल्या दुर्घटनेने या जोडप्याला मात्र एकमेकांपासून कायमचे वेगळे केले.