चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; पतीला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 01:17 AM2019-04-22T01:17:29+5:302019-04-22T01:17:54+5:30
चारित्र्याच्या संशयावरून लग्नाच्या वाढदिवशी आपल्या पत्नीवर चाकूने सपासप वार करून ठार मारणाऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी जन्मठेप व २५ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून लग्नाच्या वाढदिवशी आपल्या पत्नीवर चाकूने सपासप वार करून ठार मारणाऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी जन्मठेप व २५ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना ३ मे २०१८ साली सिडको परिसरात घडली होती. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरू होता.
सिडकोमधील पंडितनगरमध्ये राहणारा आरोपी सारीपुत्र पुंजाराम शिंदे हा त्याची पत्नी रमाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. गवंडीकाम करणारा सारीपुत्र हा रमा माहेरच्यांशी नेहमीच फोनवर बोलत असल्याने तिच्यासोबत वाद घालत होता.
यावेळी तो तिला जिवे ठार मारण्याची धमकी द्यायचा. ३ मे २०१८ रोजी लग्नाचा वाढदिवस असल्याने दुपारी हे दाम्पत्य आपल्या खोलीत असताना ही घटना घडली होती. आरोपी सारीपुत्र व रमा दुपारी दोन वाजेच्या सुमारास आपल्या खोलीतील पलंगावर बसलेले असताना त्याने पत्नीस अनैतिक संबंधाबाबत विचारणा केल्याने दोघांमध्ये वाद झाला. यावेळी रमाने त्यास चांगलेच खडसावल्याने संतप्त झालेल्या सारीपुत्रने जवळच पडलेला भाजी कापण्याचा चाकू उचलून तिच्या पोटात खुपसला. यापाठोपाठ गळ्यावरही सपासप वार केले. आरडओरड कानी आल्याने त्याचा भाऊ राहुल शिंदे याने धाव घेतली असता आरोपीने त्यास धक्का मारून घटनास्थळावरून पोबारा केला. या घटनेत रमा जागीच ठार झाल्याने राहुल शिंदे याने दिलेल्या तक्र ारीवरून अंबड पोलिसांनी आरोपी सारीपुत्रविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक निरीक्षक एस. बी. खडके यांनी करून आरोपीच्या मुसक्या आवळून न्यायालयापुढे हजर क रत दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात विशेष सरकारी वकील रवींद्र निकम यांनी सात साक्षीदार तपासले. न्यायालयाने परिस्थितीजन्य आणि प्रत्यक्षदर्शी पुराव्यांच्या आधारे आरोपी सारीपुत्र यास दोषी धरले व जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.