पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:48 PM2019-03-13T23:48:52+5:302019-03-14T00:07:22+5:30
कौटुंबिक कारणामधून उद्भवलेल्या वादातून राग येऊन माहेरी जाणाऱ्या पत्नीला धमकावत संशयित जिवाजी भुजंग पहाडे (४०) याने धारधार चाकूने सपासप वार केल्याची घटना १० एप्रिल २०१७ साली वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीत घडली होती.
नाशिक : कौटुंबिक कारणामधून उद्भवलेल्या वादातून राग येऊन माहेरी जाणाऱ्या पत्नीला धमकावत संशयित जिवाजी भुजंग पहाडे (४०) याने धारधार चाकूने सपासप वार केल्याची घटना १० एप्रिल २०१७ साली वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीत घडली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेली विवाहिता सुरेखा पहाडे हिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात खटला सुरू होता. न्यायाधीश एस. टी. पांडे यांनी संशयित जिवाजी यास पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
जिवाजी व त्याची पत्नी सुरेखा हिच्यासोबत वाद सुरू होते. १० एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास दोघांमध्ये वाद सुरू झाले. त्यामुळे राग येऊन पत्नी माहेरी जाण्यासाठी निघाली. त्यामुळे आरोपी जिवाजी याने पत्नीस शिवीगाळ करीत चाकूने पत्नीवर वार केले. त्यानंतर पत्नीला रु ग्णालयात दाखल न करता तिच्याशी भांडण करीत होता. ही बाब शेजारच्यांना समजल्यानंतर त्यांनी सुरेखाला रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचाराआधीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषित केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पहाडे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन सहायक निरीक्षक एस. एस. वºहाडे उपनिरीक्षक एच. आर. घुगे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. साक्षीदार, पंच आणि परिस्थितीजन्य पुराव्यांआधारे जिवा याने पत्नीवर चाकूने हल्ला केल्याचे स्पष्ट झाले.
न्यायालयाने भादंवि ३०४ कलमान्वये सदोष मनुष्यवधप्रकरणी पहाडे यास पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. योगेश डी. कापसे यांनी युक्तिवाद केला.