सायाळे येथे युवा मित्र संस्थेचे जलसाक्षरता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 05:14 PM2019-01-04T17:14:43+5:302019-01-04T17:16:07+5:30
सिन्नर तालुक्यातील प्रत्येक गावात जलसाक्षरता अभियानाद्वारे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्याचा प्रयत्न युवा मित्र या संस्थेकडून केला जात आहे. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने सिन्नर तालुक्यातील लोणारवाडी येथील युवा मित्र या संस्थेच्या वतीने सायाळे येथे शेतकऱ्यांचे जलसाक्षरता अभियान राबविण्यात आले.
युवा मित्र संस्थेचे अध्यक्ष सुनील पोटे यांच्या मार्गदर्शनाने युवा मित्र संस्थेचे तालुका समन्वयक प्रीतम लोणारे यांनी ग्रामस्थांना जलसमृद्धी प्रकल्पाद्वारे गावचा विकास कसा करता येईल याबाबत माहिती दिली. गाळ मुक्त धरण, गाळ युक्त शिवार या योजनेअंतर्गत गावातील नदी-नाले व पाझर तलाव यातील गाळ काढण्याची मोहीम राबवून भूजलपातळीत वाढ करण्यावर भर दिला जाणार आहे. गावातील शेतक-यांनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत मशीन मागणी अर्ज सादर करावयाचा आहे. सदरचा प्रकल्प युवा मित्र महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जाणार आहे. यासाठी संस्थेकडून यंत्रसामुग्री सरकारकडून इंधन खर्च दिला जाणार आहे. उपसलेला गाळ शेतक-यांना मोफत मिळणार असून तो त्यांनी स्वत:च्या वाहनाने त्यांच्या शेतात न्यावयाचा आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत नदी-नाले व पाझर तलाव खोली करणामुळे जलसाठ्यात वाढ होईल. तसेच युवा मित्र संस्थेचे गाळ काढणे हा काही व्यवसाय नाही तर या काढलेल्या जलस्रोतांचे नाला बंधारा यावर पुढे पाणी वापर संस्था स्थापन करणे व त्याचे नियोजन व व्यवस्थापन गावक-यांकडून करून घेणे हा मुख्य उद्देश असल्याचे तालुका समन्वयक प्रीतम लोणारे यांनी सांगितले. जलसाक्षरता अभियानामध्ये युवा मित्र संस्थेचे फील्ड कॉर्डिनेटर समाधान कासार, रोशन घुगे यांच्या सोबत सरपंच शिवाजी शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित हाते.