पिळकोस परिसरात वन्यजिवांची शिकार

By Admin | Published: June 23, 2016 11:56 PM2016-06-23T23:56:24+5:302016-06-24T00:39:19+5:30

चौरंगनाथ किल्ला : पाण्याचे सर्व स्रोत संपुष्टात आल्याने ससा, तितर, लाहुरी यांना धोका

Wildlife prey in Pilakos area | पिळकोस परिसरात वन्यजिवांची शिकार

पिळकोस परिसरात वन्यजिवांची शिकार

googlenewsNext

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस परिसरातील डोंगरावरील व चौरंगनाथ किल्यावरील जंगलातील पाण्याचे सर्व स्रोत संपुष्टात आल्याने या परिसरातील लहानमोठे प्राणी ससा, तितर, लाहुरी, कबुतर, पारवे, घोरपड या व अशा अन्य वन्यजीव पशुपक्ष्यांना पाण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी यावे लागत असल्याने या प्राण्यांच्या जिवाला धोका पोहचू लागला असून, परिसरातील व तालुक्याबाहेरील काही शिकारी यात सक्रि य झाल्याचे चित्र या परिसरात पाहावयास मिळत आहे .
या पिळकोस परिसरातील डोंगरावरील जंगलात वन्यजिवांची बऱ्याच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात शिकार होऊ लागल्यामुळे वन्यजीवपे्रमी संताप व्यक्त करत आहेत. कळवण तालुक्यातील पिळकोस गावाच्या उत्तरेकडील बाजूस प्रचंड मोठी डोंगररांग असून, यात डोंगररांगेच्या डोंगरांवर पूर्वीपासून पिण्याच्या पाण्याचे जिवंत स्रोत आहेत व या परिसरात बुट्टची विहीर व डोंगरावर टाकेही असून, तसेच फार पूर्वीपासून या डोंगररांगेवर बऱ्याच वन्यजिवांचे वास्तव्य आहे .
यात ससा, मोर, घोरपड, माकड, लांडगे, कोल्हे, बिबटे, तरस व विविध पक्षी, हिंस्र प्राणी बिबटे यांचे पूर्वीपासूनच वास्तव्य या डोंगररांगेवर अस्तित्वात आहे. पूर्वी पावसाळा मुबलक असल्यामुळे या डोंगरातील प्राण्यांना डोंगरावरील पाण्याचे स्रोत हे पावसाळा येईपर्यंत पुरत. त्यामुळे हे हिंस्र प्राणी क्वचित शिवारात आढळत. परंतु दोन वर्षापासून या प्राण्यांना आपल्या हक्काचे घर पाण्यासाठी सोडावे लागत आहे. आज डोंगराच्या पायथ्यापर्यंत शेतकरी वास्तव्यास असून, शेती करत आहेत. जंगलातील हे प्राणी पाण्यासाठी डोंगराच्या पायथ्याला येत असल्याचा फायदा घेत शिकारी टोळीकडून या परिसरातील ससा, तितर, लाहुरी, पोपट, कबुतर, पारवे अशा पक्ष्यांची शिकार केली जात असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात असून, यात दोन प्रकारचे शिकारी असल्याचेही बोलले जात आहे. काही शिकारी हे परिसरातील असून, हौस म्हणून शिकार करणारे, तर काही शिकारी शिकार करून औषधासाठी मांस, हाडे विकणारे आहेत. हे शिकारी तालुक्याबाहेरून येत असल्याचा अंदाज आहे. यात काही शेतकऱ्यांनी काही परिसरातील शिकारींना या डोंगरावर शिकार करताना पाहिलेही आहे परंतु हे परिसरातील तोंडओळखीचे असल्यामुळे शेतकरी वर्ग यांचे नाव सांगण्यास व माहिती सांगण्यास घाबरत आहेत. लोकमतशी बोलताना एका शेतकऱ्याने एवढी माहिती दिली की, या डोंगरावर शिकारी शिकारीला येतात. ते ससा, कोल्हा, घोरपड अशा प्राण्यांची शिकार करतात. आम्ही गरीब शेतकरी आहोत. आम्ही कोणाचे नाव सांगू शकत नाही. परंतु वनविभागाने जर गस्त ठेवली व काही ठरावीक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सापळा रचला तर नक्की या शिकाऱ्यांना पकडता येईल. त्यांच्यावर कठोर कारवाई केल्याशिवाय हे शिकार करण्यासाठी येणार नाहीत व कायद्याचा वचक राहील. या परिसरातील डोंगररांग ही विस्तीर्ण आहे. एकीकडे शेतकरी जंगल वाचवतात, कुऱ्हाडबंदी करून आज जंगल जतन केले जात आहे. आज जंगल झाल्यामुळे जंगलातील वन्यजिवांच्या संख्येतही वाढ आढळून आली. सदर शिकारी हे टोळीने शिकार करत असून, काही शिकारी जुन्या आजारासाठी शिकार करून ते मांस विकत असल्याचेही बोलले जात आहे. आज या परिसरातील शेतकऱ्यांनी कुऱ्हाडबंदी केल्याने व जंगल राखल्याने आज पाच वर्षांत डोंगरावर झाडे दिसू लागली आहेत व डोंगरांना जंगलाचे रूप यायला सुरुवात झाली असून, वन्यजिवांच्या संख्येत वाढ झाली आहे. पूर्वी असलेली दाट जंगले तोडली गेली, जंगलांचे महत्त्व लक्षात आल्यावर शेतकरी बांधवांनी जंगलाचे संगोपन केले.
आज जंगल तयार होऊ लागले आहे. वन्यजीवही जंगलाच्या आश्रयाला आले असून, त्यांच्या संख्येतही मध्यंतरी वाढ झाली; परंतु आज या वन्यजीवसृष्टीवर शिकारी टोळीचा डोळा असल्यामुळे वन्यजीवांची शिकार होत असल्यामुळे वन्यजीवप्रेमींकडून याबद्दल खंत व्यक्त केली जात आहे.
मागील काही वर्षांत या जंगलातील चंदनाच्या झाडांची कत्तल झाली. चंदनाची झाडे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या परिसरातील डोंगररांगेवरील एका डोंगराला चंदननळी नाव पूर्वीपासून आहे. मात्र या चंदननळीत आज चंदनाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. पिळकोस गाव हे कळवण तालुक्यात असून, या गावातील डोंगर हे देवळा वनविभागाच्या अखत्यारित आहेत. डोंगररांग जरी सलग असली तरी त्या डोंगररांगेची हद्द दोन तालुक्यात विभागली गेली असल्यामुळे याकडे दोन्हीही तालुक्यातील वनविभागाचे दुर्लक्ष आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या दोन्हीही तालुक्यातील वनविभागाने या परिसरात वनमजुरांची नेमणूक केलेली असतानादेखील या जंगलातील काही अंशी झाडे तोडली गेली आहे. याच डोंगररांगेला मांगबारी घाटातील देवळा वनविभागाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात चुलीसाठी मोळ्या काढताना चित्र पाहावयास मिळते. तसेच मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झालेली असून, या परिसरात कुऱ्हाडबंदी होणे गरजेचे आहे. कुऱ्हाडबंदी आहे परंतु शिकारी टोळ्यांमुळे पिळकोसकडील बाजूस जंगलातील पक्षी व प्राणी यांची शिकार झालेली आहे.
मांगबारी घाट ते पिळकोस, चाचेर, पांढरीपाडा या डोंगररांगेवर देवळा तालुक्याच्या वनविभागाच्या हद्दीत कुऱ्हाडबंदी असून, या हद्दीत शिकारी टोळीकडून प्राण्यांची शिकार केली जात आहे, तर देवळा वनविभागाच्या हद्दीद मांगबारी घाटाच्या जंगलात झाडांची चुलीसाठी बळतनासाठी झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे. या दोन्हीही तालुक्यातील वनविभागाने या परिसरात गस्त वाढवणे गरजेचे झाले असून, वन्यजिवांची शिकार करणाऱ्या टोळ्यांना पायबंद घालून जंगलातील झाडे व पशु-पक्ष्यांना अभय देण्यासाठी वनविभागाने कठोर पावले उचलण्याची वेळ आज आली आहे.
(वार्ताहर)

Web Title: Wildlife prey in Pilakos area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.