वन्यप्राण्यांची मानवी वस्तीकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 05:38 PM2021-02-26T17:38:31+5:302021-02-26T17:40:18+5:30
राजापूर : येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर व परिसरात सध्या कडक उन्हाळा जाणवू लागल्याने अन्न-पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसत आहेत.
बऱ्याच ठिकाणी पिण्यासाठी पाणी नसल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीकडे फिरताना दिसत आहेत. येवला तालुक्याच्या सर्वांत डोंगराळ भागात असलेल्या राजापूर व परिसरात असलेले छोटे-मोठे बंधारे सध्या कोरडे पडले आहेत. फेब्रुवारी महिना संपत आला असल्याने उन्हाळा जाणवू लागला आहे. राजापूर येथील वाड्या-वस्त्यांवर शेतकऱ्यांना फक्त पिण्याचे पाणी शिल्लक आहे. वन्यप्राणी हे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत आहे. प्रामुख्याने वानरांच्या टोळ्याच गावात भटकंती करताना दिसून येत आहेत. मिळेल तेथे घोटभर पाण्यावर तहान भागविली जात आहे. ग्रामीण भागातील लोक या वानरांना अन्न-पाणी देत आहेत. वन विभागाने वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. राजापूर व परिसरात हरीण, काळवीट, मोर यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने वन विभागामार्फत काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे, तर राजापूर गावांच्या पश्चिमेला पाणीच नसल्यामुळे वन्यप्राणी हे अन्नपाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे फिरताना दिसत आहेत.