सुरक्षेला प्राधान्य : वन्यजीवांचा अधिवास राहणार ‘समृध्द’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 04:40 PM2019-07-18T16:40:40+5:302019-07-18T16:45:11+5:30
वन्यजिवांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट इंडियाच्या मार्गदर्शक तत्वे विचारात घेऊन संस्थेने महामार्गाचे संपुर्ण सर्वेक्षण करत सुचविलेल्या सुचनांनुसार महामार्गाची संरचनेत बदल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले
नाशिक : मुंबई-नागपूरला जोडणारा एक्स्प्रेस महामार्ग अर्थात महाराष्ट्रसमृद्धी महामार्ग विकसित करताना दूरदृष्टीचा अवलंब करीत वन्यजीवांच्या संवर्धन व संरक्षणाबाबत गांभीर्याने उपाययोजना करण्यात आला आहेत. यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया या संस्थेची मदत घेत वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित व ‘समृध्द’ रहावा यासाठी वन्यजीव भुयारीमार्ग व उड्डाणमार्ग तयार करण्याची शिफारस करण्यात आली. त्यानुसार महामार्गाच्या संरचनामध्ये बदल करण्यात आल्याची माहिती महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली.
‘समृद्धी’ महामार्ग ७०१ किलोमीटर लांबीचा असून सुमारे १० जिल्हे, २६ तालुक्यांसह ३१२ गावांना जोडणाऱ्या या महामार्गाचे बांधकाम १६ भागांमध्ये विभागून पुर्णत्वास नेले जात आहे. समृद्धी महामार्ग जंगलांच्या भागातूनही जाणार आहे. तीन अभयारण्यक्षेत्रांच्या जवळून महामार्ग विकसीत होणार आहे. त्यामुळे वन्यजिवांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वे विचारात घेऊन संस्थेने महामार्गाचे संपुर्ण सर्वेक्षण करत सुचविलेल्या सुचनांनुसार महामार्गाची संरचनेत बदल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वन्यजीवांचा वावर असलेल्या भागामध्ये त्यांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार सुमारे २३ ते २५भुयारीमार्ग व उड्डाणमार्ग तयार केले जात आहे. त्यांची रचना त्या भागातील नैसर्गिक रचनेला अनुसरूनच असेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दाट वृक्षराजींनी वेढलेल्या तसेच काही प्रमाणात पाणथळ जागा तयार करून अंडरपास व ओव्हरपासची बांधणी करण्यात येणार आहे. जेणेकरून वन्यजीवांना महामार्गाच्या परिसरात सुरक्षितरित्या त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त संचार करता येणे शक्य होणार असल्याचा दावा महामंडळाने केला आहे.
-
या अभयारण्यांच्या झोनमधून ‘समृध्दी’
समृध्दी महामार्ग तीन अभयारण्यांच्या नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या कॉरिडोरमधून जात आहे. या अभयारण्यक्षेत्रांमध्ये विविध प्रकारच्या वन्यजीवांचा मुक्त संचार आहे. त्यामुळे त्यांचा अधिवास सुरक्षित रहावा यासाठी विशेष खबरदारी महामंडळाकडून महामार्ग बांधणी करताना घेतली जात आहे. ठाणे जिल्ह्यातील तानसा, बुलढाणा जिल्ह्यातील काटेपूर्णा, वशिम जिल्ह्यातील कारंजा सोहळ या तीन अभयारण्यांच्या क्षेत्रातून महामार्ग जाणार आहे. तसेच कसारा,इगतपुरी, सिन्नर या तालुक्यांमधील वनपरिक्षेत्राची माहिती करून घेत या दोन्ही तालुक्यांमधील वनपरिक्षेत्रांतर्गत महामार्गावर वन्यजिवांकरिता भुयारी मार्ग तयार केले जाणार आहेत.