न्यायडोंगरीत आहेर कुटुंबीयातच एकवटणार सत्ता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 06:52 PM2021-01-22T18:52:41+5:302021-01-23T00:51:15+5:30

न्यायडोंगरी : सरकारी दप्तरी अतिसंवेदनशील म्हणून नोंद असलेल्या तसेच जिल्ह्यातील राजकीय विश्लेषकांच्या नजरा लागून असलेल्या न्यायडोंगरी ग्रामपालिकेची निवडणूक कोणतेही गालबोट न लागता खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या निवडणुकीत माजी आमदार अनिल आहेर यांच्या परिवर्तन पॅनलने १४ पैकी १२ जागांवर दमदार विजय मिळवला, तर शिवसेना पुरस्कृत नम्रता विकास पॅनलला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. बंजारा बहुल भागात त्याच समाजाने स्वतंत्र गट स्थापन करत ३ जागा मिळविल्या. अशा १७ सदस्य संख्या असलेल्या न्यायडोंगरी ग्रामपालिकेत सरपंचपदाचे आरक्षणाकडे लक्ष लागून असले तरी आहेर यांच्या कुटुंबीकडेच सरपंचपद जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Will the Aher family unite in Nyaydongari? | न्यायडोंगरीत आहेर कुटुंबीयातच एकवटणार सत्ता?

न्यायडोंगरीत आहेर कुटुंबीयातच एकवटणार सत्ता?

Next
ठळक मुद्दे परिवर्तनचा झेंडा : यंदा सर्वसाधारण अथवा ओबीसी स्त्री आरक्षणाची शक्यता

तिरंगी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेमध्ये माजी सभापती विलास आहेर व शशिकांत मोरे या दोन गटांनी एकमेकांसमोर पॅनल निर्मिती केली तसेच उमेदवारी डावलेले कार्यकर्त्यांची नाराजी भोवल्याने शिवसेना पुरस्कृत पॅनलला पराभवाला सामोरे जावे लागले. परिवर्तन पॅनलकडे स्पष्टपणे बहुमत असल्याने पॅनलप्रमुख अनिल आहेर यांनी सरपंच आरक्षणाची प्रतीक्षा न करता ग्रामपालिका कार्यालयातील परिसराला बदल करण्यास सुरुवात केली आहे. पुढील वर्षी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच येणाऱ्या काळात सरपंचपदाची निवड व गावाचा कायापालट पाहायला मिळणार आहे. परिवर्तन पॅनलच्या विजयी उमेदवारांच्या नजरा २८ जानेवारीला होणाऱ्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत. अनिल आहेर यांनी आपल्याच कुटुंबातच सरपंचपदाची माळ गळ्यात पडावी यासाठी कुटुंबातील तीन सदस्य निवडून आणले आहेत.
गेल्या पंचवार्षिकमध्ये सरपंचपद ओ.बी.सी. पुरुषांसाठी आरक्षित होते. यावेळेस सर्वसाधारण स्त्री किंवा ओबोसी स्त्री आरक्षण निघण्याची शक्यता आहे तसे झाल्यास माजी सरपंच डॉ. शरद आहेर यांची कन्या पुणेकरांची सून असलेली पूजा आहेर यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडू शकते. तसेही सध्या चालुमितीस न्यायडोंगरी जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व नाशिकची सून करत आहे . सर्वसाधारणसाठी जर सरपंचपदाचे आरक्षण निघाले तर वॉर्ड क्र. ५ मधून निवडून आलेले आहेर यांचे पुतणे ॲड अमोल आहेर यांची दावेदारी नाकारता येणार नाही. माजी सरपंच डॉ. राजेंद्र आहेर यांना अनुभवाच्या जोरावर पुन्हा सरपंचपदाची माळ मिळेल काय, याबाबतही उत्सुकता वाढली आहे. पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र आहेर हे सून भाग्यश्री आहेर यांची दावेदारी सांगू शकतात.
हे आहेत विजयी उमेदवार
वॉर्ड क्रमांक १ मध्ये नरेंद्र नीलकंठ आहेर, भाग्यश्री आकाश आहेर. वॉर्ड क्रमांक २ मध्ये डॉ. राजेंद्र रावसाहेब आहेर, दिलीप हरी जाधव, सोनाली किशोर साळुंके. वॉर्ड क्रमांक ३ मध्ये पूजा शरदचंद्र आहेर, जीवन फुलचंद दुगड , शोभा सुरेश पवार. वॉर्ड क्रमांक ४ मध्ये अशोक ताराचंद दळवी, सुशीला अहिरे, नंदा दत्तू लगडे .
वॉर्ड क्रमांक ५ मध्ये अमोल भाऊसाहेब आहेर, नबाबाई धनराळ ,अरुणा शिवाजी शेवाळे.
वॉर्ड क्रमांक ६ मध्ये संतोष बळीराम चव्हाण, सोपान गंगाराम राठोड, मनीषा सोमनाथ पवार हे उमेदवार विजयी झाले आहेत.
पाच वर्षातच चढली पायरी
मागील पाच वर्षात ७० वर्षाची सत्ता हातातून गेल्यानंतर माजी आमदार अनिल आहेर यांनी पुन्हा सत्ता स्थापन झाल्याशिवाय ग्रामपालिकेची पायरी चढणार नसल्याचा संकल्प केला होता. तो त्यांनी पाच वर्षातच पूर्ण केला . आहेर यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये पराभव झाल्यानंतर ग्रामपालिका कार्यालयात एकदाही पाय ठेवला नव्हता. आता पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित झाल्याने आहेरांचा वरचष्मा दिसून येणार आहे.

Web Title: Will the Aher family unite in Nyaydongari?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.