केंद्रीय मंत्रिपदामुळे भाजपला मिळेल का बूस्टर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 12:21 AM2021-07-11T00:21:47+5:302021-07-11T00:27:25+5:30
आदिवासी समाजातील उच्चविद्याविभूषित महिलेला मानाची संधी दिली. आरोग्य व कुटुंब कल्याण या त्यांच्या शिक्षण व व्यवसायाशी निगडित खाते दिले.
मिलिंद कुलकर्णी
नाशिक जिल्ह्याच्या दृष्टीने गेला आठवडा हा दोन महत्त्वपूर्ण गोष्टींनी आनंदमयी ठरला. दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांचा आकस्मिकपणे केंद्रीय मंत्रिमंडळात झालेला समावेश आणि महापालिकेच्या बहुप्रतीक्षित बससेवेचा प्रारंभ या दोन घटना आहेत.
योगायोगाने दोन्ही घटना या भाजपशी संबंधित असून, त्याचा परिणाम भाजपच्या भविष्यातील वाटचालीवर, कामगिरीवर होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते स्व. ए.टी. पवार यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा राहिला आहे. मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सदस्य अशी पदे या कुटुंबात नियमित स्वरूपात येत राहिली; परंतु थेट केंद्रात मंत्रिपद हे पहिल्यांदा घडले. भाजपनेदेखील आदिवासी समाजातील उच्चविद्याविभूषित महिलेला मानाची संधी दिली. आरोग्य व कुटुंब कल्याण या त्यांच्या शिक्षण व व्यवसायाशी निगडित खाते दिले. हा एकप्रकारे पवार आणि नाशिक जिल्ह्याचा सन्मान आहे. त्यांच्या खात्याचा उपयोग आता नाशिक जिल्ह्याला होण्यासाठी डॉ. पवार यांना प्रयत्न करावे लागतील. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बससेवा लोकार्पण कार्यक्रमात फडणवीस यांच्यासमोर तशी अपेक्षा व्यक्त केली आहेच.
भुजबळ राजकारण म्हणून हे बोलले असले तरी, सर्वसामान्य नाशिककरांची अशीच भावना आहे. कोरोनाकाळात नाशिककरांनी खूप भोगले. रोज ५ हजार नवे रुग्ण येत असल्याने नाशिकचे नाव देशपातळीवर चर्चेत होते. नाशिकसारखे महानगर आणि आदिवासी व ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकार अशा दोन्ही सरकारांकडून ठोस प्रयत्नांची अपेक्षा आहे. तिसऱ्या लाटेविषयी पंतप्रधानांनी इशारा दिलेला असताना ऑक्सिजन प्रकल्पांची स्थिती बिकट आहे. जूनअखेर ४० प्रकल्प तयार होतील, अशी ग्वाही मंत्र्यांनी व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिलेली असताना केवळ भुजबळ व भुसे या मंत्र्यांच्या मतदारसंघात प्रकल्प कार्यान्वित झाले. उर्वरित ठिकाणी ते रखडले आहेत. अशा स्थितीत आम्ही तिसऱ्या लाटेचा कसा सामना करणार आहोत, पहिल्या लाटेचा अनुभव असूनही दुसऱ्या लाटेत नियोजन कोलमडल्याचे आपण सगळ्यांनी बघितले. त्याची पुनरावृत्ती होऊ नये.
भाजपला फायदा काय ?
डॉ. भारती पवार यांच्या रूपाने पहिल्या नाशिककराला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याचा आनंद आहे. पूर्वी पोटनिवडणुकीत यशवंतराव चव्हाण हे नाशिकहून बिनविरोध निवडून आले आणि केंद्रात मंत्री झाले. मालेगावच्या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे हे मोदींच्या पहिल्या कार्यकाळातील मंत्रिमंडळात समाविष्ट झाले होते. तांत्रिकदृष्ट्या हे दोन्ही नाशिकशी संबंधित असले तरी मूळ नाशिककर नाहीत.
उत्तर महाराष्ट्रात ६ पैकी भाजपचे ५ खासदार निवडून आले असताना डॉ. पवार यांची निवड ही गौरवाची गोष्ट आहे. डॉ. सुभाष भामरे यापूर्वी मंत्री होते. रक्षा खडसे या दुसऱ्यांदा खासदार झाल्या, तरी सासरे एकनाथ खडसे यांचे पक्षश्रेष्ठींशी असलेले वितुष्ट पाहता त्यांची शक्यता नव्हती. डॉ. हीना गावित प्रबळ दावेदार होत्या. त्याही दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. राजकीय पार्श्वभूमी आहे. अभ्यासू म्हणून स्वत: मोदींनी त्यांचे कौतुक केले आहे; पण त्यांना संधी का मिळाली नाही, हे कोडे आहे.
डॉ. पवार यांच्या मंत्रिपदाने नाशिक जिल्ह्यातील राजकीय समीकरण व भाजपवर काय परिणाम होतो, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे दोन प्रबळ प्रतिस्पर्धी भाजपसमोर आहेत. जिल्हा परिषद हस्तगत करणे व महापालिकेची सत्ता कायम राखणे ही दोन प्रमुख आव्हाने भाजपसमोर आहेत. डॉ. पवार यांच्या रूपाने केंद्र सरकारचा निधी नाशिक शहर व जिल्ह्यात आणला तर भाजपच्या दृष्टीने ते लाभदायी ठरेल. मात्र, एकमुखी नेतृत्वाचा प्रश्न भाजपला सोडवावा लागेल. गिरीश महाजन, जयकुमार रावल या बाहेरील नेतृत्वाच्या बळावर भाजप किती दिवस वाटचाल करेल,
स्थानिक नेतृत्वाला पक्षश्रेष्ठी कधी बळ देतील, हे संघटनात्मक प्रश्नदेखील भाजपला सोडवावे लागतील. महापालिकेच्या बससेवेचे लोकार्पण करून भाजपने आश्वासनपूर्तीच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. स्मार्ट सिटी योजनेतील हा महत्त्वाचा टप्पा आहे. ही सेवा सक्षमपणे चालणे महत्त्वाचे आहे. भुजबळ यांनी तोट्याचा उल्लेख करून नेमक्या गोष्टीवर बोट ठेवले. आता या योजनेतील कामे वेळेत आणि चांगली होण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यावरच भाजपचे यशापयश अवलंबून राहणार आहे.