प्रकल्प उभारणार, पण खर्च कोण भागवणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 12:18 AM2021-07-04T00:18:51+5:302021-07-04T00:19:52+5:30
त्र्यंबकेश्वर : शहरात कोरोनाच्या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थानने ऑक्सिजन प्रकल्प उभारणीसाठी घोषणा केली खरी परंतु ह्या ऑक्सिजन प्रकल्पाचा भविष्यात येणारा देखभाल दुरुस्तीचा खर्च कोणी भागवायचा, अशा पेचात देवस्थान सापडले आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरचा ऑक्सिजन प्रकल्प वास्तवात उतरणार की नाही याबाबत शहरवासीय संभ्रमात सापडले आहेत.
त्र्यंबकेश्वर : शहरात कोरोनाच्या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थानने ऑक्सिजन प्रकल्प उभारणीसाठी घोषणा केली खरी परंतु ह्या ऑक्सिजन प्रकल्पाचा भविष्यात येणारा देखभाल दुरुस्तीचा खर्च कोणी भागवायचा, अशा पेचात देवस्थान सापडले आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरचा ऑक्सिजन प्रकल्प वास्तवात उतरणार की नाही याबाबत शहरवासीय संभ्रमात सापडले आहेत.
दुसऱ्या लाटेत मार्च-एप्रिलमध्ये शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाचा ऑक्सिजनचाही तुटवडा जाणवायला लागला होता. त्यावेळी तहसीलदार कार्यालयात प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांचेसह मुख्याधिकारी संजय जाधव यांची संयुक्त बैठक होऊन ऑक्सिजन प्रकल्पासाठी देवस्थानला साकडे घालण्यात आले. देवस्थाननेही तत्काळ प्रकल्पासाठी संमती दर्शवली आणि एक कोटीचा निधी देण्याचेही मान्य केले. प्रकल्पासाठी ८० लक्ष तर हॉस्पिटलसाठी २० लक्ष रुपये खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार ऑक्सिजन प्रकल्प उभारणीसाठीच्या पाहणीसाठी देवस्थानच्या विश्वस्तांनी सिन्नर येथे जाऊन चाचपणीही केली. मात्र, केवळ ऑक्सिजन प्रकल्प उभारून होणार नाही तर त्यासाठी पुढे लागणाऱ्या देखभाल-दुरुस्तीचाही खर्च पेलावा लागणार आहे. प्रामुख्याने, प्रकल्पाचा वीजबिल खर्चच १८ ते २० हजार रुपये येणार असून देखभालीवरही खर्च करावा लागणार आहे; परंतु हा खर्च पेलणे देवस्थानच्या आवाक्याबाहेरचे आहे. गेल्या दीड वर्षांपासून मंदिरे बंद आहे. त्यामुळे उत्पन्नातही घट झालेली आहे. याशिवाय दैनंदिन खर्च सुरूच आहे. देवस्थान कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटीच दरमहा २० ते २५ लाख रुपये खर्च होतात. देणगी दर्शनही बंद आहे. अशा स्थितीत प्रकल्पाच्या देखभाल-दुरुस्तीच्या खर्चाबाबत देवस्थान पेचात सापडले आहे. देवस्थानने प्रकल्पासाठी निविदाही मागविल्याचे समजते. परंतु, प्रकल्प उभारणीनंतर देखभाल-दुरुस्तीचा खर्च शासनाने भागवावा, असा मतप्रवाह विश्वस्तांमधून पुढे येत आहे.
घोटी, हरसूलचा प्रकल्प जुलैअखेर?
दुसरीकडे आमदार हिरामण खोसकर यांनीही स्थानिक विकास निधीतून इगतपुरी आणि त्र्यंबक तालुक्यासाठी एक कोटी रुपये ऑक्सिजन प्रकल्पासाठी मंजूर केले आहे. या निधीमध्ये ५० लाख रुपये घोटी व हरसूल येथील प्रकल्पासाठी ५० लाख दिले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी जबाबदारी टाकली आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क साधला असता हरसूल आणि घोटीचे ऑक्सिजन प्रकल्प जुलैअखेर पूर्ण होतील, असे सांगण्यात आले. शहरातील ऑक्सिजन प्रकल्प मात्र त्र्यंबकराजाच्या भरवशावर आहे.