केंद्र सरकार कांदा निर्यात खुली करण्यासाठी तत्परता दाखवेल का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:24 AM2020-12-05T04:24:06+5:302020-12-05T04:24:06+5:30
लासलगाव : कांद्याचे दर वाढताच केंद्र सरकारने तत्परता दाखवत निर्यातबंदी लागू केली. आता कांद्याचे दर २ हजार रुपयांच्या ...
लासलगाव : कांद्याचे दर वाढताच केंद्र सरकारने तत्परता दाखवत निर्यातबंदी लागू केली. आता कांद्याचे दर २ हजार रुपयांच्या घरात आलेले असताना केंद्र सरकार कांदा निर्यात खुली करण्यासाठी तत्परता दाखवणार का, असा सवाल मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी केला आहे. दरम्यान, कांदा निर्यात तातडीने खुली न झाल्यास राज्यभरातील बाजार समित्यांशी संपर्क साधून बाजार समित्या बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही होळकर यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व पालकमंत्री भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कांदा निर्यात तातडीने खुली करावी यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात असूनही याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने शरद पवार, छगन भुजबळ यांनी निर्यात खुली होण्यासाठी केंद्राकडे हस्तक्षेप करावा, असेही निवेदनात म्हटले आहे. दि. १४ सप्टेंबर रोजी कांद्याचे दर ५ हजार रुपयांपर्यंत गेल्याने केंद्र सरकारने अत्यंत तातडीने निर्यातबंदी लागू केली. त्यानंतर कांद्याचे दर वाढू नये म्हणून व्यापारी वर्गावर प्राप्तिकर विभागाची छापेमारी, तसेच साठवणुकीवर मर्यादा व कांद्याचे दर आणखी कमी करण्यासाठी कांदा आयात करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा परिणाम सध्या नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या बाजारभावावर झाला असून, कांद्याचे दर आता २ हजार रुपयांच्या आसपास आले आहेत.
परतीच्या पावसाने लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असल्याने कांद्याला समाधानकारक दर मिळणे गरजेचे आहे. कांद्याचे घसरलेले दर लक्षात घेता तातडीने कांदा निर्यात खुली करण्याची गरज असून, केंद्राने तातडीने निर्यात खुली करावी यासाठी पवार व भुजबळ या द्वयींनी हस्तक्षेप करण्याची मागणी होळकर यांनी केली आहे.