नाशकात स्मार्ट सिटीच्या वादाची "सायकल" सुरूच राहणार?
By संजय पाठक | Published: October 22, 2020 10:30 PM2020-10-22T22:30:41+5:302020-10-22T22:34:33+5:30
नाशिक- जगातील प्रगत देशातील संकल्पना आपल्या देशात राबवण्याचा आग्रह धरणे गैर नाही, मात्र त्यासाठी स्थानिक नागरीकांची आधी मानसिकता बदलण्याची गरज आहे. मानसिकता त्या दर्जाची नसेल तर काय होऊ शकते, याचा अनुभव अलिकडेच नाशिक शहरात राबवण्यात आलेल्या बायसिकल शेअरींग प्रकल्पात आला असताना आता पुन्हा सायकल चॅलेंज नावाचे एक प्रकरण स्मार्ट सिटीने आणले आहे. सायकलींंग हे आरोग्यासाठी उत्तम असते, त्याविषयी दुमत नाही, मात्र केवळ केंद्र शासनाकडून एक कोटी रूपये हस्तगत करण्यासाठी सध्या ज्या पध्दतीने कागदे रंगवले जात आहेत, ते तद्दन मनोरंजन ठरले आहे.त्यामुळे कंपनी मागे लागलेली वादाची सायकल थांबेल काय हा प्रश्न आहे.

शाश्वत विकासासाठी पर्यवरण स्नेही उपक्रम राबवणे आवश्यक आहे. त्यामुळे नॉन मोटराज्ड साधनांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यामुळे सायकलींगला चालना दिली पाहिजे. परंतु त्याची व्यवहार्यता पडताळली पाहीजे. गेले वर्षभर सुरू असलेला शेअर बायसिकलींगचा प्रयोग चालू वर्षीच फसला. आणि हा पीपीपीमध्ये हा प्रकल्प राबवणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची वेळ स्मार्ट सिटी कंपनीवर आली. अर्धातास विनामुल्य वापर आणि त्यानंतर देखील माफक दर ही अत्यंत चांगली सेवा होती. शहरात शंभर ठिकाणी सायकल डॉक उभारण्यात आले होते. परंतु मुळातच डॉकचे लोकेशन चुकले आणि तेथून सायकलींची नासधुस सुरू झाली. सायकली चोरी होणे किंवा नुकसान करणे ही मानसिकता चुकीची असली तरी असे प्रकार होऊ नये यासाठी मात्र कोणतीही काळजी घेण्यात आलेली नव्हती. शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण भयंकर असताना निर्जन ठिकाणी किंवा अन्यत्र सायकली चोरणे चोरट्यांना कठीण गेले नाही.
हा प्रकल्प सांभाळू न शकणाऱ्या स्मार्ट सिटीने आता सायकल चॅलेंजचा नवा फंडा आणला आहे. केंद्र शासनाकडून सायकल ट्रॅक आणि तत्सम सुविधांसाठी एक कोटी रूपये मिळवण्याच्या अटहासापोटी सध्या शहरात अभिनव सुरू आहे. स्मार्ट सिटी हे प्रकरणच मुळातच विदेशी आणि कार्पोरेट कल्चरच्या धर्तीवर असल्याने वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून खूप काहीतरी केल्याचा आव आणण्याचे प्रकार सुरू आहे. सायकल चालवणे ही मुलांची पहिली धडपड असते. आणि मुले स्वत:च सायकल शिकतात असे असताना मुलांना सायकल कशी चालवायची याचे प्रशिक्षण देण्याचा अजब प्रकार कंपनीने केला. सायकल चालवताना कुठे अडचणी येतात हे साधे डोळ्यांनी दिसत असताना त्यासाठी खास सायकल फेरी आणि ॲपचा वापर करीत अशोकस्तंभ ते सातपूर पर्यंत फेरी करण्यात आली. त्यावर कडी म्हणुून कंपनीने एक अफलातून सर्वे केला आणि सायकलस्वारांना तुम्हाला सायकल चालवताना भीती वाटते का कसली वाटते असे बालीश प्रश्न विचारण्यात आले. नागरीकांनी रस्त्यावरील खडडे, उघड्या गटारी, वाहतूक कोंडी आणि भरधाव वेगाने जाणारी वाहने यामुळे सायकल चालवताना अडथळे येतात असा निष्कर्ष प्रचंड मेहनत आणि संशोधानअंती काढला आहे.
मुळात सायकली चालवण्यात अडथळे काय याचा शोध याच स्मार्ट सिटी कंपनीने तयार केलेल्या अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या रस्त्यावर घेतला असता तरी अशा स्मार्ट संकल्पांची याच कंपनीने कशी वासलात लावली ते कळले असते. अवघ्या एक किलो मीटर रस्त्याच्या कडेला असलेल्या सायकल ट्रॅकचा तर कोणता वापर होत नाहीच उलट मोटार सायकल पार्कींग या ठिकाणी तसेच पादचारी मार्गावर होत आहे. त्यामुळे संपुर्ण शहरात फिरून काही तरी केल्याचा आव आणण्याऐवजी एवढे केले असते तरी पुरे आहे. सायकल कॅपीटल व्हावी ही साऱ्याच नाशिककरांची इच्छा आहे. मात्र, गेल्या चार वषार्त ज्या पध्दतीने कंपनीचे काम वादाशिवाय संपत नाही ते बघता सायकल कॅपीटलचे स्वप्न अशा रीतीने कंपनी पुर्ण करू शकेल काय याविषयी शंकाच आहे.