अखर्चित निधीवरून सर्वसाधारण सभा गाजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 03:17 PM2019-11-15T15:17:31+5:302019-11-15T15:18:42+5:30
जिल्हा परिषदेचा सन २०१७-१८ या आर्थिक वषार्तील ८३ कोटींचा निधी शासन दरबारी जमा झालेला असताना दुसरीकडे, सन २०१८-१९ या आर्थिक वषार्तील आतापर्यंत केवळ ६० टक्के निधी खर्च झाला असल्याचे समोर आले. यावर अध्यक्षा सागंळे यांनी अलिकडेच विभागप्रमुखांची बैठक घेतली
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : जिल्हा परिषदेतील विविध विभागातील अखर्चित निधीवरून अध्यक्ष शीतल सांगळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला असून, निधी अखर्चित ठेवण्यास कारणीभूत असलेल्या अधिका-यांना जाब विचारण्यासाठी मंगळवारी (दि. १९) सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ही सभा चांगलीच गाजण्याची चिन्हे दिसू लागली असून, सर्वसाधारण सभेत घेतले जाणारे निर्णय व त्यावरील कार्यवाहीसाठी प्रशासनानेही दुस-याच दिवशी (दि. २०) रोजी सर्व खातेप्रमुखांची तातडीची बैठक बोलविली आहे.
जिल्हा परिषदेचा सन २०१७-१८ या आर्थिक वषार्तील ८३ कोटींचा निधी शासन दरबारी जमा झालेला असताना दुसरीकडे, सन २०१८-१९ या आर्थिक वषार्तील आतापर्यंत केवळ ६० टक्के निधी खर्च झाला असल्याचे समोर आले. यावर अध्यक्षा सागंळे यांनी अलिकडेच विभागप्रमुखांची बैठक घेतली असता. त्यात सन २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या आर्थिक वषार्तील प्राप्त निधी व खर्चित निधी याचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. सन २०१७-१८ या आर्थिक वषार्तील ८३ कोटींचा अखर्चित निधी शासनाकडे जमा झाल्याचे सांगण्यात आले. तर, सन २०१८-१९ या वषार्तील प्राप्त झालेल्या ४६८.५० कोटीपैकी २३८ कोटींच (६० टक्के) खर्च झाल्याचे सांगण्यात आले. तर, सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील निधीच प्राप्त झालेले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. यातही बांधकाम विभागाचा सर्वाधिक निधी अखर्चित असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महिला बालकल्याण, ग्रामपंचायत विभागाचा निधी हा अखर्चित असल्याचे सांगण्यात आले. त्यावरून सांगळे यांच्यासह पदाधिका-यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी भूवनेश्वर एस. यांना जाब विचारला. दर आठवड्याला खातेप्रमुखांच्या समन्वय सभा घेतात त्यात नेमके काय काम केले जाते अशी विचारणा करून निधी अखर्चित कसा राहिला असे पदाधिका-यांनी खडेबोल सुनाविले.