महाराष्टदिनी मिळणार मुकणेचे पाणी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 01:21 AM2019-04-26T01:21:26+5:302019-04-26T01:21:40+5:30
शहरासाठी महापालिकेने शासनाच्या मदतीने आखलेली मुकणे धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना पूर्णत्वास आल्यानंतर आता प्रत्यक्ष वितरण करण्यात येणार
नाशिक : शहरासाठी महापालिकेने शासनाच्या मदतीने आखलेली मुकणे धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना पूर्णत्वास आल्यानंतर आता प्रत्यक्ष वितरण करण्यात येणार असून, महाराष्टÑदिनी दोन जलकुंभांना जलवाहिनीद्वारे विल्होळी येथील जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. विशेष म्हणजे महापालिकेची योजना आणि पाणी देण्याचा निर्णय मुळातच खूप वर्षे अगोदरच झाला असल्याने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा किंवा ती शिथिल होण्याचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे.
वाढत्या शहराची गरज लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने केंद्र तसेच राज्य शासनाच्या मदतीने मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजना राबविण्यात आली आहे. सोळा किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेच्या माध्यमातून पाथर्डीसह अन्य नवविकासित भागाला पाणीपुरवठा करण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने एकूण शहराच्या ३० टक्के भागाला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. २६६ कोटी रुपयांची ही पाणीपुरवठा योजना नुकतीच पूर्णत्वास आली असून आता पाथर्डी फाटा परिसरातील जलकुंभांना विल्होळी येथील जलशुद्धीकरण केंद्रांतून थेट जलवाहिनी जोडण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. या भागाला पूर्वी शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथून सिडकोमार्गे पाणीपुरवठा केला जात असे. आता मात्र तो थांबणार आहे. पाथर्डी फाटा परिसरातील जलकुंभांना नव्या जलशुद्धीकरण केंद्राशी जोडून त्याद्वारे पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले़
तीन महिन्यांत चाचणी
योजनेच्या चाचणीसाठी सहा महिने लागत असले तरी महापालिकेने तीन महिन्यांत चाचणी पूर्ण केली आहे. ठेकेदाराच्या वाढीव मुदतीनुसार जूनपर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित असले तरी त्याच्या आतच हे काम पूर्ण होणार आहे. सध्या किमान दोन जलकुंभांमधून १ मे रोजी वितरण होऊ शकणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाचे कामकाज सुरू आहे.
पाणीपुरवठ्याचे सुधारित वेळापत्रक
विल्होळी जलशुद्धीकरण केंद्रावरून पाथर्डी परिसराला पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर सिडको विभागावर असलेला ताण कमी होईल त्यामुळे जलकुंभ भरण्याच्या आणि वितरणाच्या वेळादेखील बदलणार आहे. यासंदर्भात प्रकल्प विभागाने वितरणाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना वेळापत्रक तयार करण्यास सांगितले असून सध्या हेच काम सुरू आहे.