वि-किरण प्रकल्पातून आंब्याची निर्यात थांबणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 10:40 PM2020-04-01T22:40:53+5:302020-04-01T22:41:25+5:30
कोरोनाच्या संकटामुळे येथील डॉ. भाभा अणुसंशोधन केंद्राच्या कृषक वि-किरण प्रकल्पातून कोकणचा राजा हापूस आंबा यावर्षी अमेरिका व आॅस्ट्रेलियाला रवाना होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकल्पात लॉकडाउनमुळे कामकाज बंद आहे.
लासलगाव : कोरोनाच्या संकटामुळे येथील डॉ. भाभा अणुसंशोधन केंद्राच्या कृषक वि-किरण प्रकल्पातून कोकणचा राजा हापूस आंबा यावर्षी अमेरिका व आॅस्ट्रेलियाला रवाना होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकल्पात लॉकडाउनमुळे कामकाज बंद आहे.
मागील वर्षी १० एप्रिलपाासून आंब्याची निर्यात लासलगावमार्गे सुरु झालेली होती. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या आंब्याची अमेरिका त्यानंतर आॅस्ट्रेलियाला वारी सुरू झाली होती. लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या वि-किरण प्रकल्पात प्रक्रिया करून गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत आंब्याची निर्यात सुरू आहे. आॅस्ट्रेलियन मार्केटमध्येही त्याची सुरूवात झालेली होती. दरवर्षी साधारणत: एप्रिल ते जुलै या कालावधीत लासलगावच्या या केंद्रात वि-किरण प्रक्रि या केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून कृषकच्या माध्यमातून ही प्रक्रि या पार पाडली जात होती. भाभा अणुसंशोधन केंद्राशी केलेला करार संपुष्टात आल्यामुळे हा प्रकल्प मुंबईच्या अॅग्रो सर्च या कंपनीने भाडेतत्त्वावर घेतला आहे. फळमाशीच्या प्रादुर्भावाचे कारण सांगत युरोपीय महासंघाने भारताच्या हापूस आंब्यावर २०१३ मध्ये बंदी घातली होती. त्यानंतर अमेरिकेला पाठविण्यात येणाºया हापूस आंब्यावर लासलगाव येथे वि-किरण प्रक्रि या केली जाते. लासलगाव येथे ३१ आॅक्टोबर २००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलिबहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या कृषी उत्पादन संशोधन केंद्र येथे हा प्रकल्प कांद्यासाठी तयार करण्यात आला होता. मात्र, येथे आता फक्त आंब्यावर वि-किरण करून तो निर्यात केला जात आहे. अमेरिकेला जाणाºया आंब्यामध्ये हापूस, केशर, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या प्रमुख जातींचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्याने भारतीय हापूस आंब्याने लासलगाव मार्गे अमेरिकेला पोहोचला होता. दरवर्षी साधारणत १८ एप्रिल ते २० जून या कालावधीत लासलगावच्या या केंद्रात विकिरण प्रक्रिया केली जाते. यंदा मात्र लॉकडाऊनमुळे कामकाजच बंद असल्याने यंदा हापूस आंबा अमेरिका, आॅस्ट्रेलिया वारी करणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
वि-किरण प्रक्रिया म्हणजे ?
लासलगावच्या केंद्रात गॅमा किरणांचा ४०० ते ७०० ग्रे मात्रा वि-किरण मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढवली जाते. यामुळे आंबा पिकण्याची क्रि या तर लांबतेच, शिवाय कोयीतील कीडही नष्ट होते. आंब्यातील साका (सफेद गाठ) निर्मितीची प्रक्रि याही थांबते. कीड रोखण्यास हा अतिशय चांगला उपाय मानला जातो. उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रि या होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते.