दबावाने निवडणुकीबाबत निर्णय घेणार नाही : कोंडीजीमामा आव्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 01:14 AM2019-05-21T01:14:01+5:302019-05-21T01:14:22+5:30
नाशिक जिल्ह्यात सुमारे साडेसात हजार सभासद असलेल्या क्रांतिवीर व्ही. एन. नाईक संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपण्यास अजून दोन महिन्यांपेक्षा अधिक वेळ असून, त्याबाबतचा निर्णय घेण्यास अजून बराच कालावधी आहे.
सिडको : नाशिक जिल्ह्यात सुमारे साडेसात हजार सभासद असलेल्या क्रांतिवीर व्ही. एन. नाईक संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपण्यास अजून दोन महिन्यांपेक्षा अधिक वेळ असून, त्याबाबतचा निर्णय घेण्यास अजून बराच कालावधी आहे. विद्यमान संचालक मंडळाने निवडणुकीचा कोणताही धसका घेतलेला नसून या संदर्भात लवकरच स्वतंत्र बैठक घेऊन यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्टीकरण संस्थेचे अध्यक्ष कोंडीजीमामा आव्हाड यांनी लोकमतशी बोलताना दिले. कोणाच्या दबावाने निवडणुकीचा निर्णय घेतला जाणार नाही, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.
नाईक शिक्षण संस्थेच्या निवडणूक घेण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप सभासदांच्या एका गटाकडून केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी या गटाने माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या उपस्थितीत सिडकोत बैठक घेतली होती. त्यानंतर शनिवारी (दि.२५) कार्यकारिणीची बैठक होणार असून, त्यात निवडणुकीचा निर्णय घेतला जाणार आहे.
येत्या शनिवारी (दि. २५) दुपारी १ वाजता संस्थेचे अध्यक्ष कोंडीजीमामा आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत निवडणुकीबाबत चर्चा करण्याबरोबरच गेल्या दि. २८ फेब्रुवारी २०१९चे सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, आदींची चर्चा करण्यात येणार असल्याचे संचालकांकडून सांगण्यात आले़ दरम्यान, विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपण्यास अजून दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी असल्याने दरमहा होणाऱ्या बैठकीत निवडणुकीबाबत सखोल चर्चा करण्यात येणार नसून इतर विषयांबाबत चर्चा होणार आहे, तर दुसरीकडे विरोधी गटाकडून माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे हित जोपासून संस्थेची अधिक प्रगती होण्यासाठी येत्या निवडणुकीत तरुणांना संधी देण्याबाबत चाचपणी करीत असल्याचे विरोधी गटाचे निमंत्रक मनोज बुरकुले यांनी सांगितले.
संस्थेची येत्या शनिवारी संचालक मंडळाची दरमहा होणारी बैठक आहे. आम्ही कोणताही धसका घेतला नसून निवडणुकीला अजून दोन महिन्यांहून अधिक कालावधी असल्याने यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येऊन यात निवडणुकीबाबत निर्णय घेतला जाईल. संथा ही कोणाच्या दबावाखाली चालत नाही.
- कोंडाजीमामा आव्हाड, अध्यक्ष, व्ही.एन.नाईक संस्था