आता शहरातील खासगी कार्यालयातील लसीकरण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:14 AM2021-04-17T04:14:13+5:302021-04-17T04:14:13+5:30
नाशिक : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आता केंद्र शासनाच्या वतीने नाशिक शहरातील शासकीय कार्यालये तसेच खासगी आस्थापना, कार्यालये ...
नाशिक : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आता केंद्र शासनाच्या वतीने नाशिक शहरातील शासकीय कार्यालये तसेच खासगी आस्थापना, कार्यालये आणि कारखान्यांमध्ये जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. अर्थात, शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण मोफत असेल तर खासगी कार्यालयात अडीचशे रुपये मोजावे लागणार आहेत.
केंद्र शासनाने गेल्या १६ जानेवारीपासून देशात लसीकरण मोहीम सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धे तर दुसऱ्या टप्प्यात फ्रंट वर्कर त्यानंतर साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांना लस देण्यात येत आहे. त्याचबरोबर १ एप्रिलपासून शासनाने ४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांना लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर खासगी कार्यालयात देखील लसीकरणास परवानगी देण्यात आली असली तरी त्यावर अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. आता मात्र नाशिक शहरात अशाप्रकारे खासगी आस्थापनांमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. लस घेण्यास पात्र आहेत अशा ४५ वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तींनाच लसीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी नजीकच्या लसीकरण केंद्राशी संलग्न करून हे सशुल्क लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.