स्मार्ट सिटीची वार्षिक सभा वादळी ठरणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 01:21 AM2020-12-24T01:21:18+5:302020-12-24T01:22:31+5:30
वादग्रस्त प्रकल्प आणि सीईओ प्रकाश थविल यांच्या मुदतवाढीवरून स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीची वार्षिक सभा गाजण्याची शक्यता आहे. गुरुवारी (दि.२४) दुपारी बारा वाजता हेाणाऱ्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जाणार असल्याने महापालिका वर्तुळाचे लक्ष त्याकडे लागून आहे.
नाशिक : वादग्रस्त प्रकल्प आणि सीईओ प्रकाश थविल यांच्या मुदतवाढीवरून स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीची वार्षिक सभा गाजण्याची शक्यता आहे. गुरुवारी (दि.२४) दुपारी बारा वाजता हेाणाऱ्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जाणार असल्याने महापालिका वर्तुळाचे लक्ष त्याकडे लागून आहे. स्मार्ट सिटी योजना सुरू होऊन चार वर्षे पूर्ण झाली असून आता केवळ वर्ष शिल्लक आहेत. कंपनीने स्वत: पूर्ण केलेले सात प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा ठराव केला असला तरी या कामांतील उणिवा तपासून त्यानंतरच त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यातच या वार्षिक सभेत साडेचार कोटी रुपयांचा दंड झाल्यांनतर स्मार्ट रोडच्या ठेकेदाराला दंड माफ करण्यात आला आहे. त्याचा अंतिम अहवाल कंपनीसमेार येत नाही तोच या ठेकेदाराने लवाद नियुक्त करण्यासाठी अर्ज केला आहे. म्हणजेच हा ठेका वादात सापडला आहे. स्मार्ट पार्किंगचा ठेकेदार प्रकल्प परवडणार नाही याचा अंदाज घेऊन बॅकफुटवर आला आहे, तर पंचवटीत पंडित पलुस्कर सभागृहाचे काम दोन महिन्यांपासून बंद आहे. याशिवाय गावठाण विकास आणि अन्य कारणे आहेत; परंतु सर्वाधिक विषय सीईओ प्रकाश थविल यांच्या मुदतवाढीचा आहे. थविल यांना कार्यमुक्त करण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी आणि काही संचालक जोरदार प्रयत्न करीत आहेत, तर दुसरीकडे काही संचालक मात्र थविल यांचे समर्थन करीत असल्याने लोकप्रतिनिधींमध्ये दोन गट पडल्याचे दिसत आहे. त्यामुळेच या बैठकीकडे लक्ष लागून आहे.