आचारसंहितेमुळे स्मार्टरोडची मुदतवाढ रखडणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 01:16 AM2019-03-30T01:16:15+5:302019-03-30T01:16:35+5:30
त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभादरम्यान रखडलेल्या स्मार्टरोडसाठी ३१ मार्च ही डेडलाइन आहे, परंतु तो रस्ता पूर्ण होणे तर अशक्यच आहे.
नाशिक : त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभादरम्यान रखडलेल्या स्मार्टरोडसाठी ३१ मार्च ही डेडलाइन आहे, परंतु तो रस्ता पूर्ण होणे तर अशक्यच आहे. ऐन आचारसंहिता कालावधीत ठेकेदाराला मुदतवाढ देता येण्याविषयीदेखील पेच निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कंपनी आचारसंहितेचे नियम पडताळूनच याबाबत निर्णय घेणार असल्याचे वृत्त आहे.
स्मार्टरोडचे काम सुरू केल्यानंतर ते संपणार कधी हे स्मार्ट सिटी कंपनीला ठरवणे शक्यच होत नसून ठेकेदाराच्या संथगतीने हा विषय हाताबाहेर चालला आहे. या कामासाठी ३१ मार्च ही मुदत असली तरी अद्याप अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका पेट्रोल पंप दरम्यानचे काम पूर्ण झालेले नसल्याने ३१ मार्च ही मुदतच हास्यास्पद असल्याचे मानले जात आहे. सुरू असलेल्या कामाला मुदतवाढ देणे ही नियमित बाब आहे की, प्रभाव टाकणारा निर्णय ठरू शकतो याबाबत खल सुरू आहे. तथापि, आचारसंहितेची पडताळणी करूनच याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
आचारसंहितेमुळे सर्वच धास्ती
लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडे झालेल्या बैठकीत भूमिपूजन झाले, परंतु सुरू न झालेली कामेदेखील थांबविण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे प्रशासन सर्वच बाबतीत काळजी घेतली जात आहे.