शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी 1 मेपासून शेतकरी सन्मान यात्रा- राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2018 07:59 PM2018-04-29T19:59:43+5:302018-04-29T19:59:43+5:30
'शेतकऱ्यांना सरकारविषयी विश्वास वाटत नाही'
नाशिक : खचलेल्या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी सन्मान यात्रा काढणार आहे. 1 मेपासून मराठवाडा व पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमधून ही यात्रा काढली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्यानं त्यांना धीर देण्यासाठी यात्रांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिली. नाशिक येथील हुतात्मा स्मारकाजवळ झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार असंवेदनशील असून, देशात दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आणि त्यांना आत्महत्येच्या विचारातून परावृत्त करण्यासाठी १ मे पासून मराठवाडा व पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमधून शेतकरी सन्मान यात्रा काढण्यात येणार आहे. मंत्रालयात प्रवेश करून आत्महत्या करणारे धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांच्या विखरण गावातून या सन्मान यात्रेला प्रारंभ होणार आहे. धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात शेतकरी सन्मान यात्रेची सुरुवात होणार आहे. यानंतर संध्याकाळी शहादा येथे मुक्काम व पुढे जळगाव, औरंगाबाद, बुलडाणा, वाशिम, नांदेड, परभणी, जालना, लातूर असा प्रवास करून उस्मानाबाद जिल्ह्यातील शिरढोण येथे पोहोचल्यानंतर शेतकरी सन्मान यात्रेचा ९ मे रोजी समारोप होणार आहे. आत्महत्या करणारे शेतकरी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या नावानं चिठ्ठी लिहून आणि स्वत:चं सरण रचून आत्महत्या करत आहेत. यावरून शेतकऱ्यांचा सरकारवर विश्वास उरला नसल्याचं स्पष्ट होत असून, त्यांचे मनोधैर्य पूर्णपणे खचलं असल्याचंही शेट्टी म्हणाले.