मन उधाण वाऱ्याचे, ऊन पावसाचे..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 01:11 AM2018-11-11T01:11:04+5:302018-11-11T01:11:24+5:30
सूर्यास्तावेळी तांबडं झालेलं आभाळ, सांजवेळी अवतरलेली गुलाबी थंडी आणि या रम्य संध्येला हिंदी-मराठी गीतांचे सुमधुर आवाजातून होणारे सादरीकरण अशा आल्हाददायक वातावरणात गुरुवारची संध्याकाळ उजळून निघाली. निमित्त होते गोदाश्रद्धा फाउण्डेशनच्या वतीने आयोजित सांज पाडवा या सांस्कृतिक कार्यक्र माचे!
गंगापूररोड : सूर्यास्तावेळी तांबडं झालेलं आभाळ, सांजवेळी अवतरलेली गुलाबी थंडी आणि या रम्य संध्येला हिंदी-मराठी गीतांचे सुमधुर आवाजातून होणारे सादरीकरण अशा आल्हाददायक वातावरणात गुरुवारची संध्याकाळ उजळून निघाली. निमित्त होते गोदाश्रद्धा फाउण्डेशनच्या वतीने आयोजित सांज पाडवा या सांस्कृतिक कार्यक्र माचे! गोदाश्रद्धा फाउण्डेशनच्या वतीने गुरु वारी (दि. ८) बॉईज टाउन विद्यालयाच्या प्रांगणात सांज पाडव्याचे आयोजन करण्यात आले होते. गणपती श्लोक गायनाने या मैफलीला प्रारंभ झाला. त्यानंतर प्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशी यांनी ‘माझे माहेर पंढरी’ या भक्तिगीताने कार्यक्र माची सुरुवात केली. प्रारंभी गोदाश्रद्धा फाउण्डेशनचे संस्थापक तथा नाशिक मनपाचे माजी सभापती सुरेश पाटील यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, ‘लोकमत’च्या दिल्ली आवृत्तीचे संपादक सुरेश भटेवरा, माजी आमदार माणिकराव कोकाटे, नितीन भोसले, विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते, राष्ट्रवादीचे रंजन ठाकरे, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, गोदाश्रद्धा फाउण्डेशनचे अध्यक्ष कृणाल पाटील आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्र माची सुरुवात करण्यात आली. कृणाल पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
गायिका सावनी रवींद्र, स्वप्नील गोडबोले, विश्वजा जाधव, सुशीलकुमार मिस्त्री यांनी मन उधाण वा-याचे, राधा ही बावरी, तेरी दिवानी, सैराट झालं जी, रश्के कमर, जीव दंगला अशी एकापेक्षा एक हिंदी-मराठी गीते सादर केली. त्याला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. सावनी रवींद्र हिने गायलेल्या लावणीच्या वेळी तर उपस्थित असलेल्या लहानग्यांनी थेट मंचावर जाऊन ठेका धरला.