नांदूरशिंगोटेत वाऱ्या डोंगराला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:14 AM2021-05-20T04:14:50+5:302021-05-20T04:14:50+5:30
नांदूरशिंगोटे : परिसरातील वाऱ्या डोंगराला रात्री दहाच्या दरम्यान अचानक आग लागल्याने रौद्ररूप धारण केले होते. परिसरातील आदिवासी बांधवांनी शर्थीचे ...
नांदूरशिंगोटे : परिसरातील वाऱ्या डोंगराला रात्री दहाच्या दरम्यान अचानक आग लागल्याने रौद्ररूप धारण केले होते. परिसरातील आदिवासी बांधवांनी शर्थीचे प्रयत्न करून आग एका तासामध्ये आटोक्यात आणली. आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवित अथवा मालमत्तेची हानी झाली नाही.
दोन महिन्यांपूर्वी याच डोंगराला रात्रीच्या वेळी आग लागली होती. मात्र, येथील आदिवासी बांधव व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली होती. त्यावेळी जंगल संपत्तीचे मोठे नुकसान झाले होते. सोमवारी त्या आगीच्या शेजारीच पुन्हा आग लावण्यात आली. त्यातच चक्रीवादळामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. आग आटोक्यात येते की नाही, हाच प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, या भागातील आदिवासी बांधवांनी शर्थीचे प्रयत्न करून आग एका तासामध्ये आटोक्यात आणली. आग आटोक्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या जिवात जीव आला. घटनेची माहिती पोलीस प्रशासन व वन विभागाला देण्यात आली होती. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कर्मचारी पाठवून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
फोटो ओळी : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरातील वाऱ्या डोंगरावर पेटलेला वणवा.