वाऱ्याचा वाढला वेग; पावसाची हुलकावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 01:26 AM2018-06-14T01:26:15+5:302018-06-14T01:26:15+5:30
गेल्या वर्षाच्या तुलनेत नाशिककरांना यंदा मान्सूनची अधिक प्रतीक्षा करावी लागणार आहे. मागील वर्षी १२ ते २३ जूनच्या दरम्यान नाशिक जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला होता; मात्र यावर्षी अद्याप हवामान खात्याकडून नाशिकमध्ये मान्सून सक्रिय होण्याच्या तारखांविषयीचा अंदाज जाहीर करण्यात आलेला नाही.
नाशिक : गेल्या वर्षाच्या तुलनेत नाशिककरांना यंदा मान्सूनची अधिक प्रतीक्षा करावी लागणार आहे. मागील वर्षी १२ ते २३ जूनच्या दरम्यान नाशिक जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला होता; मात्र यावर्षी अद्याप हवामान खात्याकडून नाशिकमध्ये मान्सून सक्रिय होण्याच्या तारखांविषयीचा अंदाज जाहीर करण्यात आलेला नाही. मागील वर्षी मान्सूनपूर्व पावसाने २ व ३ जून रोजी जोरदार सलामी दिली होती. त्यानंतर मान्सूनचा पहिला पाऊस १२ जून रोजी झाला होता. ११ ते १२ जूनच्या दरम्यान २४ तासांत ३९.१ मिमी इतका पाऊस शहरात झाला होता. या दरम्यानच मान्सून सक्रिय झाल्याची माहिती हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आली होती. १३ जूनपर्यंत नाशिकमध्ये मागील वर्षी ६१ मिमीपर्यंत पाऊस झाला होता. यंदा मात्र या सर्व तारखा कोरड्या गेल्या आहेत. अरबी समुद्रात मान्सून पोहचला असला तरी पुढे मान्सून सरकण्यास पूरक अशी नैसर्गिक स्थिती निर्माण झाली नसल्याने विलंब होत असल्याचे कारण हवामान विभागाने सांगितले आहे. पुढील तीन ते चार दिवस केवळ सोसाट्याचा वारा अनुभवयास येण्याची नाशिककरांना शक्यता आहे. मागील तीन दिवसांपासून शहरात वाºयाचा वेग प्रचंड वाढला आहे. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत वाºयाचा वेग वाढलेला असतो आणि रात्री जोर कमी होत असल्याचे निरीक्षण पेठरोडवरील हवामान केंद्राने नोंदविले आहे. मंगळवारी (दि.१२) ११ किमी प्रति तास वेगाने शहरात वारा वाहत होता. बुधवारी मात्र वाºयाचा वेग अधिक वाढल्याची नोंद हवामान केंद्राने केली.
मान्सूनपूर्व पावसाचाही दगा
मागील वर्षी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली होती. १० जूनपर्यंत दोन ते तीन वेळा जोरदार पाऊस शहरात व जिल्ह्यात झाला होता. त्यानंतर १२ जूनपासून जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्याने नाशिककरांना पावसाची फारशी प्रतीक्षा करावी लागली नव्हती; यावर्षी अरबी समुद्रातून मान्सून पुढे सरकण्यासाठी लागणारी पूरक अशी परिस्थिती निर्माण न झाल्याने यंदा नाशिककरांना मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यावर्षी मान्सूनला होणारा विलंब आणि मान्सूनपूर्व पावसानेही दगा दिला आहे.