कळवण तालुक्यात काँग्रेस नेतृत्वात बदलाचे वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:10 AM2021-07-12T04:10:15+5:302021-07-12T04:10:15+5:30
तालुका युवक व शहर काँग्रेस नेतृत्वात बदल कळवण : पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. ...
तालुका युवक व शहर काँग्रेस नेतृत्वात बदल
कळवण : पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. तर शेतकऱ्यांनासुद्धा याचा फटका बसत आहे. महागाई या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ काँग्रेसने आंदोलन आणि निदर्शने करून तालुक्यात काँग्रेस पक्ष सक्रिय असल्याचे दाखवून देताना काही बाबींमध्ये मात्र काँग्रेसने गटबाजीचेही दर्शन घडविले.
कोरोनाकाळातदेखील काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर मास्क, सॅनिटायझर वाटपात सक्रिय असल्याचे चित्र कळवण शहरात व तालुक्यात दिसून आले. जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती शैलेश पवार यांनी पहिल्या लाटेत सक्रीय भूमिका घेतली. ऐन कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तालुका काँग्रेस, युवक काँग्रेस आणि शहर काँग्रेसच्या नेतृत्वात बदल, पदाधिकारी नियुक्तीचे वारे वाहत असताना नेतृत्वाची नवीन लाट तालुक्यात आणली. त्यात युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष शैलेश पवार, काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश पगार यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे.
तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र हिरे मात्र आक्रमक शैली आणि मागील काळात केलेल्या आंदोलनामुळे तालुकाध्यक्षपदावर कायम राहिले. केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन, कांदा भाववाढ आंदोलन, नांदुरी येथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखविणे, मराठा आरक्षण मुद्द्यावर राजीनाम्याचा लेटरबॉम्ब, वसाकाप्रश्नी आक्रमक भूमिका या हिरे यांच्या जमेच्या बाजू असल्यामुळे तालुक्यात काँग्रेस पक्ष टिकून ठेवण्यात त्यांचे योगदान ही जमेची बाजू ठरली. त्यामुळे जिल्हा नेतृत्वाने त्यांना पाठबळ दिले. मात्र त्यांच्या जोडीला तालुका काँग्रेस कार्याध्यक्षपदावर कळवण खुर्दचे प्रगतशील शेतकरी केदा सोनवणे या नेतृत्वाला जिल्हा काँग्रेसने संधी दिली आहे.
तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावर प्रशांत पगार व जिल्हा काँग्रेसने कळवण शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी सागर जगताप यांची नियुक्तीकरून जगताप यांना बढती दिली आहे. यापूर्वी ते युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष होते. महागाई आंदोलन निमित्ताने नवे नेतृत्व उमेदीने कामाला लागल्याचे दिसून आले. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडवून आणलेल्या बदलाचे वारे आणि तालुकाध्यक्षचा फोटो टाळून नवीन पदाधिकारीच्या बॅनरबाजी वरून काँग्रेसमधील गटबाजीचे दर्शन घडले, त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण हे नवीन नसल्याने कळवण तालुका त्याला अपवाद कसा असणार आहे. अलीकडे पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ तालुका पातळीवर काँग्रेसने निदर्शने केली. प्रदेश काँग्रेसकडून तालुका पातळीवर काँग्रेसला सतत कार्यक्रम दिले जात आहेत. हे कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी त्या-त्या तालुका व शहराच्या अध्यक्षांवर येऊन पडत असल्यामुळे नवीन नेतृत्व कामाला लागले आहे.