अस्वस्थतेचे हुंदके अन् असंतोषाचे वारे !
By संजय पाठक | Published: April 29, 2020 11:14 PM2020-04-29T23:14:44+5:302020-04-29T23:29:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : हमे यहॉँ क्यू रखा गया है... हमने क्या गुनाह किया है... हमे छोडते क्यू नही... असे असंख्य प्रश्न निवारा केंद्रात महिनाभरापासून लॉकडाउनमध्ये अडकलेले जिल्ह्यातील स्थलांतरित करीत आहेत. आज उद्या निर्णय होईल आणि या अटकेतून सुटका होईल, अशी त्यांची असलेली अस्वस्थता आता संयम सोडण्याच्या मार्गावर आहे. येत्या ३ मे रोजी लॉकडाउनच्या दुसऱ्या सत्रात त्याचा फैसला न झाल्यास मग मात्र यंत्रणेला त्यांची आव्हान देणारी भाषा अडचणीची ठरू शकण्याची शक्यता आहे.
नाशिक : हमे यहॉँ क्यू रखा गया है... हमने क्या गुनाह किया है... हमे छोडते क्यू नही... असे असंख्य प्रश्न निवारा केंद्रात महिनाभरापासून लॉकडाउनमध्ये अडकलेले जिल्ह्यातील स्थलांतरित करीत आहेत. आज उद्या निर्णय होईल आणि या अटकेतून सुटका होईल, अशी त्यांची असलेली अस्वस्थता आता संयम सोडण्याच्या मार्गावर आहे. येत्या ३ मे रोजी लॉकडाउनच्या दुसऱ्या सत्रात त्याचा फैसला न झाल्यास मग मात्र यंत्रणेला त्यांची आव्हान देणारी भाषा अडचणीची ठरू शकण्याची शक्यता आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेल्या महिन्यात देशभरात लॉकडाउन आणि संचारबंदीची घोषणा करण्यात आली आणि देशभरात आलेल्या स्थलांतरित मजुरांचे हाल झाले. हे लोंढे जमेल त्या साधनाने गावाकडे जात असताना देशाच्या, राज्याच्या आणि जिल्हा इतकेच नव्हे तर शहरांच्या सीमा सील झाल्या. राज्यातील आणि परराज्यातील शेकडो मजूर अडवून त्यांना तात्पुरत्या निवारा केंद्रात थांबविण्यात आले. त्यांना क्वॉरंटाइन करून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असली तरी आता चौदा दिवसांचा सोडा अनेकांचा दुप्पट दिवसांचा क्वॉरंटाइन कालावधी पूर्ण झाला. परंतु बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. रोज वेळच्या वेळी भोजन मिळत असले तरी त्यापलीकडे काहीच काम नाही. सतत कुटुंबातील सदस्यांच्या आठवणी आणि घराच्या ओढीने सारेच अगतिक झाले आहेत.
मुळात त्यांना थांबवून ठेवल्यानंतर त्यांना निवारा केंद्रात थोपविण्याचे कारण योग्य पध्दतीने समजावण्याची कोणतीची यंत्रणा नाही. त्यातच भाषेचा अडसर आणि अन्य अनेक गोष्टी अडचणीच्या असूनही ते राहत असताना सारेच जण मेटाकुटीस आले आहेत.
नाशिक शहरातील महापालिकेच्या निवारा केंद्रात १५ निवारा केंद्रांत सुमारे आठशे नागरिक असून तीनशे तर परप्रांतीय आहेत. तर संपूर्ण जिल्ह्यात दोन हजार नागरिक आहेत. देशभरात लॉकडाउन १४ एप्रिलपर्यंत असेल म्हणून साऱ्यांनी तग धरला. परंतु नंतर ३ मेपर्यंत लॉकडाउनचा दुसरा टप्पा कळाल्यानंतर अनेक केंद्रांमध्ये शासकीय, मनपा कर्मचाºयांशी वाद घातल्याचे सूत्रांनी सांगितले. लॉकडाउनचा दुसरा टप्पा वाढल्यानंतर २० एप्रिल रोजी राज्याराज्यांची स्थिती बघून निर्णय शिथिलता देण्याबाबत निर्णय घ्यायचे केंद्र सरकारने सूतोवाच केल्याने या अडकलेल्या नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु त्यानंतर स्थलांतरित मजुरांचा काहीच निर्णय झाला नसल्याने पुन्हा एकदा अस्वस्थता पसरली आहे.
----
जे काही होईल, ते गावीच होऊ द्या!
निवारा केंद्रातून बाहेर पडल्यास अनेक अडचणी आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असे कर्मचारी सांगत असले तरी परप्रांतीय नागरिक मात्र अत्यंत टोकाला पोहोचले असून, आम्हाला आमच्या कुटुंबीयांसमवेत असताना काही झाले तरी चालेल परंतु आता आम्हाला आता बाहेर पडू द्या, अशीच त्यांची मागणी आहे. त्यामुळे आता सर्वांचे ३ मेपर्यंतच्या लॉकडाउनकडे लक्ष लागले आहे.