महापालिकेच्या महासभेत वादळी चर्चा
By admin | Published: July 21, 2016 12:59 AM2016-07-21T00:59:25+5:302016-07-21T01:04:24+5:30
मालेगाव : कॉँग्रेसचा सभात्याग; विविध विषयांना मंजुरी
आझादनगर : मालेगाव मनपाच्या रुग्णवाहिकेचे दर निश्चित करणे, मनपा रुग्णालयात विशेष प्रसूतीतज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करणे, मनपाची जिमखान्यासाठी आरक्षित जागा तालुका क्रीडा संकुलास देणे व मनपा शाळेत इयत्ता आठवीचे वर्ग सुरू करावे आदि विषयांवर मनपा महासभेत जोरदार चर्चा झाली.
मनपाच्या रूग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञाच्या विषयाबाबत महापौरांनी चर्चेस नकार दिल्याने काँग्रेस नगरसेवकांनी सभात्याग केला; तर क्रीडा संकुलास जागा देण्याबाबत या विषयात गौडबंगाल असून त्यात महापौरांचे हित असल्याचा आरोप करीत नगरसेवक गुलाब पगारे यांनी सभात्याग केला. महासभेस राष्ट्रगीतान सुरूवात झाली. महाराष्ट्र मनपा अधिनियम १९४९ चे कलम ४४ नुसार मनपाच्या दोन रूग्णवाहिका कार्यरत असून त्याचे दर निश्चित करण्याचे अधिकार कुणाचे यावर चर्चा करण्यासाठी विषय घेण्यात आला. यावेळी असलम अन्सारी यांनी सांगितले की, पूर्वी परतीस पाच रूपये प्रतिकिमी प्रमाणे भाडे आकारले जात होते. मात्र आज १२ रूपये प्रमाणे भाडे आकारणी करण्यात येत आहे. त्यामुळे गोरगरीबांना मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. यावर आरोग्य अधिकारी डॉ. डांगे उत्तर देण्यासाठी आले असता काँग्रेस सदस्यांनी त्यांच्या नियुक्तीवरच आक्षेप घेत गंभीर आरोप केले. ज्या डॉक्टरांची अधिकृत नियुक्तीच झाली नाही तो भाडेवाढीचे पत्र कसे देतो व त्यास अधिकार कुणी दिले, असा प्रतिसवाल केला. यावर उपायुक्त गोसावी यांनी मान्य केले की त्यांची तोंडी आदेशान्वये नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच शासनाकडून अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात येईल. त्यावर महापौरांनी मागील ५ रूपये प्रतिकिमी दरास मंजुरी दिली. गुरूवार वॉर्डातील स. नं. १८१/१ या खाजगी जमिनीतून दोन्ही महामार्गास जोडणारा रस्ता जाणार आहे. त्यास खाजगी वाटाघाटी करुन १६.१७ च्या बाजार मूल्यनुसार खरेदी करुन संपादन करणेस मंजुरी देण्यात आली. मालधे घरकुल योजनेसाठी विद्युत पुरवठा करणेकामी उपकेंद्रास ३६०० चौ. मी. जागा देण्यास मंजुरी देण्यात आली.
मनपा शाळेत इयत्ता आठवीस मान्यता देवून बढतीच्या प्रतिक्षेत अनेक शिक्षक सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यावर शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी म्हणाले की, उर्दू शाळा क्रमांक ८८, ३८, ५७ मध्ये मागणी प्रमाणे इयत्ता आठवीचे वर्ग सुरू आहेत व शिक्षकांचे नियोजन सुरू असून शिक्षकांना बढती देण्यात येईल असे आश्वासन दिले. महासभेत प्रामुख्याने शहरातील वर्तमान पत्रे व नागरिकांच्या तक्रारी, आंदोलनाची सभागृहात दखल घेतली गेल्याचे पहावयास मिळाले. त्यावर मदन गायकवाड, रिजवान खान, अब्दूल मलिक यांनी स्वच्छता विभागाच्या प्रमुख निरीक्षक गोविंद परदेशी यांना धारेवर धरले. यावर आयुक्तांनी हस्तक्षेप करीत मनपा सदस्यांना अवघा काही वेळ देण्याची विनंती करीत नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. मनपाच्या रूग्णालयात विशेष प्रसुती तज्ज्ञ डॉक्टरांच्या आडमुठे धोरणामुळे गत दोन महिन्यापासून शस्त्रक्रिया बंद आहेत. यावेळी काँग्रेस नगरसेवक यांनी जोरदार प्रहार करीत गोरगरीबांना कर घेवून आरोग्य सेवा देवू शकत नाही. ज्यांच्यामुळे सामान्य रूग्णालयाचा पूर्णत: बोजवारा उडाला. अशा डॉक्टरांची मनपाच्या आरोग्य अधिकारीपदी नियुक्ती केली गेली ते काय दिवे लावणार आहेत, असा प्रश्न केला. याविषयावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने काँग्रेस सदस्यांनी सभात्याग केला.