पारखच्या अतिक्रमणावरून वादळी चर्चा
By admin | Published: January 15, 2015 12:07 AM2015-01-15T00:07:50+5:302015-01-15T00:08:04+5:30
१६ ला निर्णय शक्य? : जिल्हा परिषद स्थायी समिती सभा
नाशिक : जिल्हा परिषदेच्या मालकीचा महात्मा गांधी रस्त्यावर असलेला कोट्यवधी रुपयांचा भूखंड खाली करून घेण्यावरून व त्यावरील पक्के अतिक्रमण काढण्यावरून जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत वादळी चर्चा झाली.
विशेष म्हणजे, यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये १३ जानेवारीच्या अंकात वृत्त प्रकाशित झाले होते. त्यात हे अतिक्रमण काढण्याबाबत सदस्य व पदाधिकारी उदासीन असल्याचा आरोप माजी सदस्य राजाराम शेलार यांनी केला होता.
त्यावर स्थायी समितीचे सदस्य प्रा. अनिल पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. गेल्या अडीच वर्षांपासून या प्रकरणावर चर्चा होते; मात्र कार्यवाही होत नाही. वारंवार न्यायप्रविष्ठ बाब असल्याचे कारण देऊन वेळ मारून नेली जाते असा आरोप पाटील यांनी केला, तर रवींद्र देवरे यांनी मागील पंचवार्षिकमध्ये तत्कालीन उपाध्यक्ष दिगंबर गिते यांनी त्यांच्या जबाबदारीवर हा भूखंड ११ महिन्यांच्या करारावर दिला होता. प्रत्यक्षात पाच वर्षे उलटूनही हे अतिक्रमण ‘जैसे थे’ असल्याचे सांगितले. या सर्वांवर कडी करत शैलेश सूर्यवंशी यांनी या प्रकरणामुळे लोकप्रतिनिधींकडेच संशयाने पाहिले जात असून, रंगीत टीव्ही व फ्रीजबाबतही उलटसुलट चर्चा असल्याचे सांगताच सभागृहात हशा पिकला. प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांनी ही न्यायप्रविष्ठ बाब असून, येत्या १६ तारखेला त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सांगितले, तर अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी रहीम मोगल यांना धारेवर धरत, आपले अधिकारीच तारखांना हजर राहत नाहीत, भूखंड खाली करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले.