इच्छुकांचे पंख छाटण्यावरून भाजपात सुंदोपसुंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:55 AM2019-08-22T00:55:35+5:302019-08-22T00:56:01+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपात इनकमिंग वाढल्याने प्रस्थापितांना धास्ती वाटत आहे. परंतु पक्षांतर्गत दावेदारांमुळेदेखील राजकारण स्पर्धा वाढली असतानाच अंतर्गत इच्छुकांमध्येही वाद वाढू लागले आहेत.
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपात इनकमिंग वाढल्याने प्रस्थापितांना धास्ती वाटत आहे. परंतु पक्षांतर्गत दावेदारांमुळेदेखील राजकारण स्पर्धा वाढली असतानाच अंतर्गत इच्छुकांमध्येही वाद वाढू लागले आहेत. महापालिकेच्या महासभेत एका इच्छुकाने प्रतिष्ठेचा प्रश्न केलेल्या प्रस्तावाला तहकूब ठेवून जाणीपूर्वक अडचणीत आणण्यात आले तर पंचवटीत ज्यांच्या प्रभागात कार्यक्रम आहे त्या प्रभागाचे नगरसेवक महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापतींनाही आमदारांनी कार्यक्रमास न बोलाविल्याने भाजपातीलराजकारण रंग घेऊ लागले आहेत.
ज्या भाजपाकडे एकेकाळी प्रभागात नगरसेवक निवडणुकीसाठी उमेदवार नव्हते, त्या पक्षात आता मोठ्या प्रमाणात नेते वाढल्याने प्रत्येक पदासाठी स्पर्धा वाढत आहे. त्यातच भाजपाला लोकसभेपाठोपाठ विधानसभेसाठी अच्छे दिन दिसत असल्याने या पक्षातदेखील दावेदारांची संख्या वाढत चालली आहे. भाजपाच्या वतीने आता दावेदारांची स्पर्धा निकोप न राहता ती वादापर्यंत पोहोचू लागली आहे. दृश्य-अदृश्य स्वरूपात अनेक प्रकाराची गटबाजी वाढत असून त्यातच गेल्या दोन दिवसांतील दोन घटना चर्चेचा विषय ठरल्या आहेत. महापालिकेच्या महासभेत सीबीएसबी स्कूल सुरू करण्याचा प्रस्ताव होता.
हा प्रस्ताव गेल्यावर्षीपासून चर्चेत असून तो आपलाच असल्याचा दावा स्थायी समितीच्या तत्कालीन सभापती असलेल्या हिमगौरी आडके या सातत्याने करतात. परंतु मंगळवारी (दि.२०) झालेल्या महासभेत हा प्रस्ताव धोरणात्मक विषय असल्याने सवडीने चर्चाच करण्यासाठी महापौरांनी तहकूब ठेवल्याने त्यामागे आमदारकीचे राजकारण असल्याची चर्चा होत असून, यासंदर्भात आडके यांनी श्रेष्ठींकडे तक्रारदेखील केल्याची चर्चा आहे.
दुसऱ्या बुधवारी (दि. २१) घडलेल्या घटनेची चर्चा आहे. आडगाव भागात एका समाजमंदिराचा लोकार्पण सोहळा होत असताना त्या भागातील आमदार बाळासाहेब सानप यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उध्दव निमसे यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. निमसे हे या प्रभागाचे नगरसेवक नसून स्थायी समितीचे सभापती आहेत. तथापि, आमदारकीच्या स्पर्धेतून हा प्रकार घडल्याची चर्चा असून, त्यामुळे भाजपात निवडणुकीपूर्वीचे रंग अधिक वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत.