वाईनरी कॅपिटल दिंडोरीत फार्मा इंडस्ट्रीजची भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:11 AM2021-07-10T04:11:05+5:302021-07-10T04:11:05+5:30

दिंडोरी (भगवान गायकवाड) : वाईन कॅपिटलबरोबरच दिंडोरी तालुक्याची आता फार्मा हब म्हणून लवकरच ओळख होणार आहे. तालुक्यात मॅक्डोवेल, ...

Winner Capital Dindori Pharma Industries | वाईनरी कॅपिटल दिंडोरीत फार्मा इंडस्ट्रीजची भरारी

वाईनरी कॅपिटल दिंडोरीत फार्मा इंडस्ट्रीजची भरारी

Next

दिंडोरी (भगवान गायकवाड) : वाईन कॅपिटलबरोबरच दिंडोरी तालुक्याची आता फार्मा हब म्हणून लवकरच ओळख होणार आहे. तालुक्यात मॅक्डोवेल, सुला वाईन, सीग्राम यासारख्या मोठ्या वाईनरींबरोबरच असणाऱ्या छोट्या कंपन्यांनी अगोदरच पाय रोवले असताना अक्राळे-तळेगाव एमआयडीसीकडेही रिलायन्स उद्योग समूहाबरोबरच इतरही नव्या कंपन्या आकृष्ट झाल्याने तालुक्यासह जिल्ह्यातील बेरोजगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

तालुक्यात पालखेड औद्योगिक वसाहतीनंतर नाशिक शहर, राष्ट्रीय महामार्ग व विमानतळाजवळ असलेल्या अक्राळे-तळेगाव एमआयडीसीची स्थापना दहा वर्षांपूर्वी झाली. या एमआयडीसीत सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विविध उद्योजकांनी पाहणी केली. मात्र, भूखंडांचे दर अधिक असल्याने अनेकांनी पाठ फिरविली. अखेर शासनाने येथील दर कमी केल्यावर येथे रिलायन्स उद्योग समूहाने औषध निर्माणसाठी स्वारस्य दाखवीत सुमारे १६१ एकरवर मेगा प्रकल्प सुरू करण्याची तयारी सुरू केल्याने औद्योगिक वसाहतीत भूखंडांची मागणी वाढू लागली आहे.

---------------------------

पायाभूत सुविधा उपलब्ध

दिंडोरी तालुक्यात लखमापूर, कादवा म्हाळुंगी, वलखेड, खतवड, जानोरी, पिंपळणारे, दहावा मैल, जवळके दिंडोरी परिसरात विविध छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. मात्र, हे क्षेत्र एमआयडीसीअंतर्गत नसल्याने येथे आवश्यक पायाभूत सुविधा नाहीत. पालखेड येथे औद्योगिक वसाहत झाली. मात्र, तेथे एक फार्मा कंपनी वगळता सर्व स्टील रोलिंग मिल झाल्याने तेथे स्थानिक जनतेला अपेक्षित रोजगार मिळाला नाही. २०१४ साली तळेगाव अक्राळे शिवारात प्रस्तावित एमआयडीसी झाली. त्यात ५२५ एकर जमीन संपादित होत पालखेड धरणातून पाण्याच्या पाइपलाइनचे काम झाले, तसेच विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या क्षेत्रात प्रत्येक व्यावसायिकांच्या मागणीनुसार भूखंड आकार ठरवीत देण्याचे नियोजन झाले.

--------------------

मुख्यमंत्र्यांच्या उद्योग विभागास सूचना

राज्य शासनाने सदर ठिकाणच्या जागेचे दर कमी करीत पुन्हा हालचालींना वेग दिला. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदर बाबीकडे खास लक्ष घालण्यास सांगितले. स्व:त ठाकरे यांनी तातडीने सदर ठिकाणी उद्योग यावे यासाठी उद्योग विभागास सूचना केल्या व नुकतेच रिलायन्स लाइफ सायन्स कंपनीने त्यांचा लसनिर्मिती करण्याच्या प्रकल्पासाठी १६१ एकरचा भूखंड घेतला असून, लवकरच काम सुरू होणार आहे. त्यासोबतच पिनकल गॅस ने ३.५ एकर, तर ऑक्सिजन सिटी २.५ एकरवर ऑक्सिजन प्लांट सुरू करणार आहे, तर इतर इंडियन ऑइल कंपनीने ६० एकर जागेची मागणी केली आहे. इतर छोटे-मोठे उद्योजकांनी ही भूखंड मागणी केली आहे. रिलायन्सच्या एंट्रीने आता विविध कंपन्या तळेगाव अक्राळे येथे स्वारस्य दाखवीत असल्याने हजारो युवकांना रोजगार मिळत परिसराचा विकास होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, रोजगार देताना स्थानिकांना प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्यावे ही भावना स्थानिकांची आहे.

--------------------

तळेगाव अक्राळे एमआयडीसीत विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, रिलायन्स लाइफ सायन्स कंपनीचा १६१ एकरवर प्रकल्प होणार आहे. सुमारे २५०० कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यासोबतच सहा एकरवर दोन ऑक्सिजन प्रकल्पही सुरू होणार आहेत. इंडियन ऑइलनेही ६१ एकरची मागणी केली आहे. एमआयडीसीकडे जागा मागणी वाढली असून, लवकरच अनेक उद्योग येथे उभे राहण्याची अपेक्षा आहे.

- नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी, औद्योगिक विकास महामंडळ

---------------------

तळेगाव अक्राळे एमआयडीसीत विविध पायाभूत सुविधा देत मोठे उद्योग यावेत यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होता. मात्र, जागेचे दर अधिक असल्याने अडचणी येत होत्या. शासनाने सदर दर कमी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महामंडळाचे अधिकारी यांनी या क्षेत्रात उद्योग येण्यासाठी पुढाकार घेतल्याने उद्योग येण्यास सुरुवात झाली असून, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत परिसराचा विकास होणार आहे.

- नरहरी झिरवाळ, उपाध्यक्ष विधानसभा

---------------------

तळेगाव अक्राळे एमआयडीसी

प्रस्तावित क्षेत्र : ३७२ हेक्टर

संपादित क्षेत्र : २०६ हेक्टर

रिलायन्स लाइफ सायन्स प्रकल्प : १६१ एकर

पिनकल गॅस ऑक्सिजन प्रकल्प : ३.५ एकर

ऑक्सिजन सिटी ऑक्सिजन प्रकल्प : २.५ एकर

इंडियन ऑइल मागणी : ६१ एकर

प्रत्यक्ष रोजगार अपेक्षा : ३.५ ते ४ हजार

एमआयडीसी अंतर

नाशिक शहर १५ कि.मी.

राष्ट्रीय महामार्ग आग्रा - १२ कि.मी.

जानोरी विमानतळ - १० कि.मी.

राष्ट्रीय महामार्ग नाशिक धरमपूर १६ कि.मी.

चेन्नई सुरत प्रसावित हायवे ५ किमी

दिंडोरी शहर ५ किमी

भूखंड भाव ३००० चौ.मी.

सध्याचे दर २७०० चौ.मी. (०९ अक्राळे)

Web Title: Winner Capital Dindori Pharma Industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.