ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज अर्ज माघारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 01:40 AM2021-01-04T01:40:25+5:302021-01-04T01:41:26+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीत सोमवारी (दि.४) होणाऱ्या अर्ज माघारीनंतर निवडणूक रिंगणातील चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये दिवसेंदिवस रंगत चढत असून अर्ज माघारीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीत सोमवारी (दि.४) होणाऱ्या अर्ज माघारीनंतर निवडणूक रिंगणातील चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये दिवसेंदिवस रंगत चढत असून अर्ज माघारीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. अर्ज माघारीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असल्याने राजकीय तडजोडींची चर्चा जोरदार सुरू आहे.
जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी होऊन १६ हजार ६०२ उमेदवारांचे अर्ज आहेत.
जिल्ह्यातील ५८९५ जागांसाठी १७ हजार अर्ज दाखल झाले होते. गुरुवारी (दि.३१) झालेल्या अर्ज छाननी प्रक्रियेत ४०४ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. सोमवारी होणाऱ्या माघारीनंतर निवडणुकीचे चित्र समेार येणार आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठीचे प्रयत्न होत असल्याने माघारी नाट्याच्या घडामोडी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. माघारीनंतर अनेक ग्रामपंचायती बिनविरोधही होण्याची शक्यता आहे. माघारीनंतर रिंगणातील उमेदवारांना चिन्ह वाटपही केले जाणार आहे.