अवघ्या तासाभरात दोन महिलांचे दागिने लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 01:41 AM2021-10-08T01:41:42+5:302021-10-08T01:43:14+5:30

शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना लागोपाठ सुरूच असून जणू चोरट्यांनी मालिकाच लावली आहे. दोन दिवसांपूर्वी बारा तासांत दोन सोनसाखळ्या चोरट्यांनी गायब केल्या, तर गुरुवारी (दि.७) संध्यकाळी अवघ्या तासाभरात उपनगरच्या सानेगुरुजी नगर भागात आणि अंबड पोलीस ठण्याच्या हद्दीत अभियंतानगरमध्ये चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील लाखोंचे दागिने हिसकावून पोबारा केला.

Within an hour, two women were robbed of their jewelry | अवघ्या तासाभरात दोन महिलांचे दागिने लुटले

अवघ्या तासाभरात दोन महिलांचे दागिने लुटले

googlenewsNext
ठळक मुद्देदर्शनासाठी निघालेल्या महिला टार्गेट उपनगर, अंबडला संध्याकाळी लागोपाठ घटना

नाशिक : शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना लागोपाठ सुरूच असून जणू चोरट्यांनी मालिकाच लावली आहे. दोन दिवसांपूर्वी बारा तासांत दोन सोनसाखळ्या चोरट्यांनी गायब केल्या, तर गुरुवारी (दि.७) संध्यकाळी अवघ्या तासाभरात उपनगरच्या सानेगुरुजी नगर भागात आणि अंबड पोलीस ठण्याच्या हद्दीत अभियंतानगरमध्ये चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील लाखोंचे दागिने हिसकावून पोबारा केला.

शहर व परिसरात सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातला असून, या सोनसाखळी चोरांना आवरण्यास पोलीस यंत्रणा सपेशल अपयशी ठरू लागल्याची चर्चा नागरिकांत केली जात आहे. एकीकडे पेट्रोलपंपावर पोलीस मनुष्यबळ गुंतवून ठेवले जात असताना दुसरीकडे मात्र गस्तीसाठी पोलीस अपुरे पडत असून सोनसाखळी चोरांना रान माेकळे मिळत आहे. उपनगर पोलीस ठाणे हद्दीत सानेगुरुजीनगर येथे महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर फिर्यादी श्वेता मकरंद पिसोळकर (५२,रा.आनंद हाऊसिंग सोसा. मोटवानीरोड) या त्यांच्या मैत्रिणीसोबत घरी जात होत्या. यावेळी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दुचाकीने आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे चार तोळे वजनाची १ लाख २० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. या घटनेनंतर तत्काळ नाशिकरोड, देवळाली कॅम्प, इंदिरानगर, अंबड, मुंबई नाका आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी सुरू करण्याचे आदेश दिले गेले; मात्र तरीदेखील अवघ्या तासाभराच्या अंतराने अंबड पोलीस ठाणे हद्दीतील अभियंतानगरमध्ये महिलेला सोनसाखळी चोरांनी लक्ष्य करत पोलिसांच्या नाकावर टिच्चून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पलायन केले. रात्री उशिरापर्यंत पोलीस या दोन्ही घटनांमधील चोरट्यांचा शोध घेत होते; मात्र यश आले नाही, उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

--इन्फो--

सोनसाखळी चोरांचा हैदोस

उपनगर, नाशिकरोड, मुंबईनाका, अंबड, गंगापूर, आडगाव या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरांनी मागील आठवडाभरापासून हैदोस घातला आहे. दुचाकीस्वार चोर महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पोलिसांना खुले आव्हान देत आहेत. एकापाठोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

--इन्फो--

नवरात्रोत्सवात चोरट्यांची ‘दिवाळी’

नवरात्रोत्सवात धार्मिक स्थळे शासनाने खुली केली असून महिला भाविकांकडून देवी मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावण्यास सुरुवात झाली आहे. याचाच गैरफायदा सोनसाखळी चोरांकडून घेतला जात आहे. मागील तीन दिवसांत चार वेगवेगळ्या भागात घडलेल्या घटनांमधून हे अधोरेखित झाले आहे. घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला दोन चेनस्नॅचिंगच्या घटना तर घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी दोन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरट्यांनी लांबविले.

Web Title: Within an hour, two women were robbed of their jewelry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.