अवघ्या दीड तासात शहर जलमय

By admin | Published: June 15, 2017 01:00 AM2017-06-15T01:00:14+5:302017-06-15T01:03:25+5:30

कोसळधार : रस्त्यावर साचले तळे, अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; तळमजले पाण्यात, बुधवार बाजारावर पाणी

Within a matter of one and a half hours the city is submerged | अवघ्या दीड तासात शहर जलमय

अवघ्या दीड तासात शहर जलमय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह बुधवारी (दि.१४) झालेल्या मुसळधार पावसाने नाशिककरांची त्रेधातिरपिट उडविली. शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले होते, तर व्यापारी संकुलांसह रहिवासी सोसायट्यांचे तळमजले पाण्यात बुडाल्याने नागरिकांचे हाल झाले. शहरासह उपनगरीय भागातील पावसाळी भूमिगत गटारी पूर्णपणे तुंबल्याने शहरातील संपूर्ण रस्ते
पाण्याखाली गेले होते.संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास शहरासह उपनगरीय भागांमध्ये ढगांचा गडगडाट सुरू झाला, याबरोबरच वाराही सुटला आणि पावसाला सुरुवात झाली. अवघ्या काही मिनिटांतच पावसाने जोर धरला. मुसळधार पावसाला शहर व परिसरात सुरुवात झाल्याने अर्ध्या तासातच सर्व भागातील रस्ते जलमय झाले होते. तसेच इमारतींचे तळमजले पाण्याने तुडुंब भरल्याने व्यावसायिकांसह नागरिकांची धावपळ झाली. बुधवारचा आठवडे बाजार असल्यामुळे गोदाकाठावरील विक्रेत्यांबरोबरच नागरिकांचे मोठे हाल झाले. विक्रेत्यांचे धान्य, भाजीपाला पाण्यात वाहून गेला, तसेच काही विक्रेत्यांचे पैशांचे गल्लेही वाहून गेले. तसेच गोदाकाठाभोवती असलेल्या दुचाकीदेखील पाण्यात वाहून गेल्याचे चित्र यावेळी पहावयास मिळाले. धान्यविक्रेत्यांचे धान्याची पोती वाहून गेली. पावसाचा जोर जरी जास्त असला तरी गोदाकाठावरील भुयारी गटारीचे चेंबर तुडुंब भरून वाहत होते.
गटारी व नाल्याचे सांडपाणी मोठ्या प्रमाणावर वाहू लागल्याने बाजारात दुर्गंधीयुक्त पाण्याचे पाट वाहू लागल्याने नागरिकांनी महापालिकेच्या गलथान कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला. शहरातील गंगापूररोड भागातही केटीएचएम कॉलेजसमोर एका बाजूला तळे साचल्याने रस्ता बंद करण्यात आला. आयटीआय पुलाजवळ रस्त्यावरील पाण्यामुळे तासभर वाहतूक कोंडी झाली होती. सायंकाळच्या वेळी शासकीय आस्थापना आणि खासगी कार्यालयांची सुटी झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस होईल याची कल्पना नसल्याने तयारी नसलेल्या नागरिकांना विविध व्यापारी संकुले आणि अन्य कार्यालयाचा आसरा घ्यावा लागला. अनेकांच्या दुचाकी तळ्यांमध्ये अडकल्याने त्यांना त्या बाहेर काढणे मुश्कील झाले होते. मुसळधार पावसामुळे अनेक मार्गांवरील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.पालिकेचे मुख्यालय असलेल्या शरणपूररोडवरील राजीव गांधी भवनसमोर सुमारे अर्धा फूट इतके पाणी साचले होते. यामुळे सुयोजित ट्रेड संकुलातील तळमजले पाण्यात बुडाल्याने तळमजल्यावरील दुकानदारांचे हाल झाले. पालिकेच्या दारात पाण्याचा तलाव साचून रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. या भागात नागरिकांनी चेंबर खुले करून दिल्याने काही प्रमाणात पाणी प्रवाही करण्यात आल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळाला.

Web Title: Within a matter of one and a half hours the city is submerged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.